औरंगाबाद - आपल्या आजुबाजूला घडणारं सगळ काही थरकाप उडवणारं आहे. सकाळी झोपेतून उठल्यापासून ते रात्री उशिरा अंग टाकण्यापर्यंत सतत कोरोनामुळे अमूक गेला, इतक्या जणांचे बळी असेच शब्द कानी पडत आहे. मृत्यूचं असं तांडव सुरू आहे, जणू जगात दुसरं काही घडतचं नाही. औरंगाबादमध्येही स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी जागा मिळत नसल्याचे पहायला मिळत आहे.
दुपारपर्यंत एकाच स्मशानभूमीत नऊ अंत्यविधी
औरंगाबादसह मराठवाड्यात कोरोना बधित मृतांची संख्या रोजच वाढत आहे. बीड जिल्ह्यात एकाच चितेवर आठ जणांचा अंत्यविधी करण्याची वेळ आली होती. मात्र, सर्वच ठिकाणी अशीच स्थिती ओढवत असल्याच दिसून येत आहे. औरंगाबादच्या सिडको एन 12 स्मशानभूमीत अवघ्या काही तासांमध्ये नऊ मृतदेहांवर अंत्यविधी करण्याची वेळ आली आहे. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी तीन शेड आहेत. अंत्यविधी झाले असल्याने जागे अभावी मोकळ्या मैदानात कोरोना बाधित सहा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. एकाच वेळी नऊ मृतदेहांच्या चिता पेटत असल्याच भयावह चित्र गुरुवारी दुपारी पाहायला मिळाले.