महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना इफेक्ट : दूधसंघाला रोज दीड लाखांचा तोटा, सरकारनेही अनुदान थकवले - औरंगाबाद जिल्हा दूध सहकारी संघ

लॉकडाऊन आधी रोज 50 हजार लिटर दूध बंद पाकिटातून विक्री होत होते. मात्र आता यामध्ये जवळपास 30 ते 35 टक्क्यांनी घट झाली आहे. अशा परिस्थितीत दूध संघाला रोज दीड लाखांचे नुकसान सहन करावे लागत आहे.

कोरोना इफेक्ट
कोरोना इफेक्ट

By

Published : Aug 19, 2020, 8:47 AM IST

Updated : Aug 19, 2020, 5:35 PM IST

औरंगाबाद - कोरोनामुळे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. औरंगाबाद जिल्हा दूध सहकारी संघाला रोज दीड लाखांचे नुकसान होत असल्याची माहिती दूध संघाकडून देण्यात आली आहे. मागील पाच महिन्यांमध्ये नुकसान होत असतानाच सरकारने अनुदान बंद केले. आधीचे जवळपास पाच कोटींचे अनुदान थकवल्याची माहिती दूध संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे यांनी दिली.

कोरोना महामारीच्या आधी करण्यात येणाऱ्या दूध संकलनात संघाने कोणताही फरक पडू दिला नाही. दूध हे नाशवंत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी आम्ही दूध विकत घेतले. पहिल्यापेक्षा जवळपास दहा ते पंधरा हजार लिटर दुधाची मागणी घटली आहे. विक्री कमी झाल्याने खासगी दूध संघांना प्रतिलिटर पाच रुपयांचे नुकसान सहन करून दूध द्यावे लागत आहे. त्यामुळे शासकीय दूधसंघाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचे दूधसंघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे यांनी सांगितले.

कोरोना इफेक्ट

हेही वाचा -ऑक्सफर्डच्या लसीची मानवी चाचणी मुंबईच्या नायर रुग्णालयात होणार

औरंगाबाद जिल्हा दूध सहकारी संघाच्या वतीने रोज 80 ते 85 हजार लिटर दूध शेतकऱ्यांकडून घेतले जाते. त्यापैकी सध्या 30 हजार लिटर दुधाची विक्री बाजारात बंद पाकिटामार्फत केली जाते. दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी एक ते दोन हजार लिटर दूध वापरले जाते. तर पंधरा हजार लिटर दूध हे मुंबई दूध संघाला दिले जात आहे. शिल्लक राहिलेलं दूध खासगी दूध संघाला द्यावं लागतं. शासकीय दूध संघाकडून शेतकऱ्यांना पंचवीस रुपये प्रति लिटर दुधासाठी दर दिला जातो. मात्र, यावेळी शिल्लक राहिलेले दूध खासगी दूधसंघांना दिले जात असताना देखील आता 21 रुपये प्रति लिटर दराने दूध द्यावे लागत आहे. त्यामध्ये दूध पोहोचण्याचा खर्च देखील दूधसंघालाच करावा लागतोय. त्याला प्रति लिटर एक रुपया खर्च येतो. त्यामुळे प्रति लिटर पाच रुपयांचे नुकसान दूध संघाला सहन करावे लागते.

लॉकडाऊनमध्ये थंड किंवा गोड खाल्ल्याने कोरोना होण्याचा धोका अधिक असतो, अशा अनेक बातम्या समोर आल्या होत्या. त्यामुळे दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीवर मोठा परिणाम दिसून आला. आधी रोज किमान सात ते आठ हजार लिटर दूध हे दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी लागत होते. मात्र, सध्या दीड ते दोन हजार लिटर दूध दुग्धजन्य पदार्थ बनवण्यासाठी लागत आहे. दही, ताक, खवा, पनीर, अशा दूध पदार्थांची विक्री कमी झाली आहे.

हेही वाचा -मराठा समाजाच्या मागण्याचा पाठपुरावाही आरक्षण उपसमिती करणार; मुख्यमंत्र्यांचा निर्णय

लॉकडाऊन आधी रोज 50 हजार लिटर दूध बंद पाकिटातून विक्री होत होते. आता त्यामध्ये जवळपास 30 ते 35 टक्क्यांनी घट झालीय. अशा परिस्थितीत दूध संघाला रोज दीड लाखांचे नुकसान सहन करावे लागत आहे. जुलै महिन्यापासून दुधाला मिळणारे अनुदान बंद करण्यात आले. मात्र, त्याआधी शासनाकडे जवळपास पाच कोटी रुपये अनुदान थकले आहे. शासनाने अनुदान थकवले असले, तरी दूधसंघाने मात्र शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान दिले आहे. शेवटच्या काही दिवसांचे अनुदान द्यायचे बाकी आहे. कोरोना महामारीच्या काळात हॉटेल, वसतिगृहे बंद असल्याने दुग्धजन्य पदार्थांसह दुधाची मागणी घटली. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या महिन्याच्या शेवटी दूध संघाची विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत दूध संघाला होणारे नुकसान कमी करण्याबाबत काही उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती देखील दूध संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे यांनी दिली.

दुग्धजन्य पदार्थांची विक्री घटली आहे. विशेषतः मिठाईच्या विक्रीत घट झाली आहे. पूर्वीपेक्षा जवळपास 60 ते 70 टक्क्यांनी विक्री कमी झाली आहे. यावर्षी तर दहावीचा निकाल मिठाई-पेढे विना झाल्याचा अनुभव औरंगाबादच्या व्यावसायिकांनी सांगितला. हॉटेल व्यवसाय बंद असल्याने पनीरची विक्री घटली आहे. दूध आणि तुपाच्या व्यवसायावर जास्त परिणाम नसला, तरीही सणाच्या दिवशी पुरणपोळीवर असणारे तूप नाहीसे झाल्याचे मत प्रभा डेअरी व्यावसायिक राजेश जैन यांनी व्यक्त केले.

Last Updated : Aug 19, 2020, 5:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details