छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) :कर्नाटक विधानसभा निवडणुकीत जनतेने काँग्रेसला स्पष्ट बहुमत दिले आहे. कर्नाटकात राहुल गांधी यांच्या यात्रेचा फायदा झाला. कर्नाटकच्या जनतेने भाजपचा भ्रष्टाचारी चेहरा समोर आणल्याचा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. मागच्या वर्षीसुद्वा आम्हाला काठावर बहुमत दिल होते. लिंगायत समाजाच्या जोरावर भाजप पक्ष निवडून आला होता. मात्र त्याच लिंगायत समाजाला वाळीत टाकण्याचे काम भाजपने केले. त्यामुळे त्यांना तिथल्या जनतेने वाळीत टाकले. कर्नाटकात 124 च्यावर जागा सुशिक्षित मतदारांनी काँग्रेसला दिल्याचेही नाना पटोले यांनी यावेळी स्पष्ट केले.
राहुल गांधींच्या यात्रेचा फायदा झाला :कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 121 पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. भाजपने राहुल गांधीवर खोटा आरोप लावून त्यांचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द करण्याचे पाप केले. राहुल गांधींना भाजपने बेघर केले. त्यामुळे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला मानण्याची देशात सुरुवात झाली आहे. मला स्वतःला 91 शिव्या घातल्या असे मोदी म्हणतात, मात्र गांधी कुटुंबियांवर किती शिव्या दिल्या यावर पुस्तक निघेल. राहुल गांधीकडे आम्ही पंतप्रधान म्हणून पाहतो. राहुल गांधी शिकलेले आहेत, आताचे पंतप्रधान किती शिकले मला माहित नसल्याचा टोलाही नाना पटोले यांनी यावेळी लगावला.
अजित पवारांना माझी योग्यता कळली :नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यायला नको होता, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. त्यावर त्यांना माझी योग्यता कळाली, ते माझे कौतुक करत आहेत, याबाबत मी त्यांना धन्यवाद देतो. उलट त्यांनी एक वर्ष आमचा अध्यक्ष का होऊ दिला नाही, याचे उत्तर द्यावे असा सवालही नाना पटोले यांनी यावेळी केला. तत्कालीन उपाध्यक्षांनी त्या 16 आमदारांना अपात्र का केले नाही? याचा उत्तर त्यांनी द्यावे, अशी टीकाही नाना पटोले यांनी केली.