औरंगाबाद - राज्यात उदयास येणारे नवीन सत्तासमीकरण अवघे दोन वर्षे टिकेल, असे भाकीत काँग्रेसचे माजी खासदार विजय नवल पाटील यांनी केले आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते. राज्यात युतीला जनादेश असून देखील इतर पक्षांनी सत्तेसाठीचा आटापिटा सुरू केला असल्याचा आरोप देखील विजय पाटील यांनी केला.
राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाची अवस्था वाईट होती. पुढील काही वर्षे विरोधात बसण्याची त्यांची मानसिकता होती. शिवसेनेसोबत महाशिवआघाडी स्थापन केल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला नवसंजीवनी मिळणार असल्याचेही पाटील यांनी सांगितलं.
राज्यात नवीन आघाडी स्थापन करण्याच्या विचारात असणारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची विचारधारा वेगळी आहे. तीन टोकाचे तीन लोक सोबत आणायला अवघड जाते. त्यामुळे सत्ता स्थापन करायला वेळ लागत आहे. हे तीन वेगळ्या विचारधारेचे पक्ष सोबत आले तर सरकार स्थापन होईल. मात्र हे सरकार दोन वर्षांपेक्षा जास्त काळ चालणार नाही. हे मी अनुभवावरून सांगतो असेही पाटील यांनी सांगितलं.