औरंगाबाद - काँग्रेस नेते राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेसच्यावतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्ते यांच्यामध्ये वादावादी झाली. त्यानंतर पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
राहुल गांधींच्या अटकेविरोधात काँग्रेस आक्रमक
आज काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी पीडित तरुणीच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी जात असताना त्यांना पोलिसांनी थांबवले. यावेळी फक्त दोघांनाच पुढे जाण्याची परवानगी देण्यात आल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी कार्यकर्त्यांसोबत पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, पोलिसांकडून त्यांना धक्काबुक्की झाली. याचा काँग्रेसकडून देशभर निषेध व्यक्त केला जात आहे.
औरंगाबादच्या क्रांती चौक भागात काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. आंदोलन करत असताना भाजपा विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. 'मुख्यमंत्री योगी हटाव, बेटी बचाव' अशा घोषणाही देण्यात आल्या. राहुल गांधी यांच्यावर करण्यात आलेली कारवाई ही राजकीय आहे. एका खासदाराला अशा पद्धतीने धक्काबुक्की होत असल्याने देशात कायदा-सुव्यवस्था आहे का? असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला.
हाथरस पीडित मुलीच्या घरी जाण्याचा प्रयत्न करत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना पोलिसांनी अडवले. त्यावेळी त्यांना धक्काबुक्कीदेखील झाली. या धक्काबुक्कीत राहुल गांधी खाली पडले. त्यानंतर पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना अटक केली. ही कारवाई अमानुष असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. या गोष्टीचा सर्वांनीच निषेध करायला हवा. अशा पद्धतीची कुठलीच कारवाई काँग्रेस खपवून घेणार नाही, असा इशाराही काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिला.