औरंगाबाद - खासदार इम्तियाज जलील यांनी नाव न घेता बेगमपुरा भागात काँग्रेसचे नगरसेवक पत्त्याचा क्लब चालवत असल्याचा आरोप केला होता. यावर काँग्रेस नगरसेवक अफसर खान यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. त्यामध्ये त्यांनी खासदार झाले म्हणजे पंख लागले का? तु काय माझ्याकडे येतो, तु सांग कुठे येऊ असे आव्हान खासदार जलील यांना दिले आहे. लवकरच पत्रकार परिषद घेऊन खासदार जलील यांनी केलेला गैरप्रकार समोर आणणार असल्याचेही अफसरखान यांनी सांगितले.
औरंगाबादचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत बेगमपुरा भागातील काँग्रेस पक्षाचे नगरसेवक अफसर खान यांचे नाव न घेता ते पत्त्याचा क्लब चालवीत असल्याचा आरोप केला होता. जुगार अड्डा बंद न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर सोमवारी रात्री नगरसेवक अफसर खान यांनी एक व्हिडीओ प्रसारित केला आहे. या व्हिडिओमध्ये खासदार जलील हे पत्रकार असताना त्यांनी ब्लॅकमेलिंग केले, असा आरोप त्यांनी केला आहे. तर जलील आमदार असताना जे-जे विषय त्यांनी उचलले आहेत, त्या विषयात सेटलमेंट झाली आहे. कोणतीही शहानिशा न करता खासदार जलील हे माझ्यावर आरोप करत असल्याचे अफसरखान सांगत आहेत.