औरंगाबाद- औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांनी अर्ज भरला आहे. गुरुवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस होता. शिवसेनेने शक्तिप्रदर्शन करीत पक्षातील नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. गेल्या 20 वर्षापासून शिवसेना जिल्हाप्रमुख पदावर असलेले अंबादास दानवे यांनीदेखील शिवसेनेकडून अर्ज भरला. तर बाबुराव कुलकर्णी यांनी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.
युतीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे आणि अर्जुन खोतकर यांनी उपस्थिती लावली. तर काँग्रेसतर्फे अर्ज करताना बड्या नेत्यांनी पाठ फिरवली. त्यामुळे स्थानिक नेत्यांनाच घेऊन बाबुराव कुलकर्णी यांनी अर्ज दाखल केला. युतीतर्फे अंबादास दानवे यांचा एकतर्फी विजय होईल, असा विश्वास औरंगाबादचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. क्रांतीचौक भागातून अंबादास दानवे यांनी वाहनातून रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल केला. तर बाबुराव कुलकर्णी यांनी शहागंज येथून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हार घालून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.