औरंगाबाद- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलताना राजकारणाचे नवे संकेत दिले आहेत. केंद्रीय राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे यांच्याकडे बघून व्यासपीठावरचे आजी-माजी सहकारी आणि भविष्यात पुढं पुन्हा एकत्र आले तर भविष्यातील सहकारी सगळ्यांचे स्वागत करतो, अशी भाषणाची सुरूवात केल्याने राज्यात आता अनेक चर्चा रंगत आहेत. ठाकरे इतकेच बोलले नाही तर रावसाहेब दानवेंकडे पाहत म्हणाले, 'या मुंबईला. बरेच दिवस झाले आला नाहीत'. असं म्हणल्याने राजकीय समीकरण बदलण्याचे संकेत दिल्याने जोरदार चर्चा रंगली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ पत्रकार परिषदेत देखील व्यक्तव्याला दुजोरा -
जिल्हा परिषद इमारत भूमिपूजन सोहळ्यात केलेल्या वक्तव्याबाबत उद्धव ठाकरे यांनी दुजोरा देत, भविष्यात आणि राजकारणात काहीही होऊ शकतं. त्याबाबत नंतर कळेलच. राजकारण आपल्या जागी आहे. त्याला विकृत स्वरूप येऊ देऊ नका. हल्ली विकृत स्वरूप येत असून ते होऊ नये असे वाटते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. तर केंद्रात भाजपाचे सरकार आहे. आपल्या पदाचा अहंकार न करता, त्याचा लोकांच्या कामांसाठी उपयोग व्हावा, असा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे स्पष्टीकरण उद्धव ठाकरे यांनी दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद डिएमआयसी येथील ऑरिक सिटीची पाहणी केली व त्यानंतर पत्रकार परिषद घेतली. नागपूर- मुंबई बुलेट ट्रेनसाठी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा आहे. याबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींजीचा वाढदिवस आहे. सामाजिक माध्यमाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेतच. मात्र तुमच्या माध्यमाद्वारे मी त्यांना सर्वांच्या वतीने, शिवसेनेच्या वतीने वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो तसेच त्यांना निरोगी व आनंदी दिर्घायुष्य लाभो, अशा शुभेच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिल्या.