मुंबई -राज्यातील नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याचा खर्च कोटींच्या घरात गेल्याची माहिती समोर आली आहे. 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरेंसह सहा मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, या शपथविधीला खर्च पहिला तर सर्वसामान्यांच्या भुवया उंचावतील. कारण या सोहळ्यासाठी तब्बल 2 कोटी 89 लाख रुपये खर्च झाला आहे. माहिती अधिकारात मागावलेल्या माहितीमध्ये धक्कादायक खुलासा झाला आहे.
हेही वाचा -'चंद्रकांत पाटलांना सत्ता गेल्याच्या धक्क्यातून सावरण्याची शक्ती मिळो'
उस्मानाबादचे उमरगा येथील माहिती अधिकार कार्यकर्ते निखिल रवींद्र चनशेट्टी यांनी शपथविधी सोहळ्याचा खर्च विचारला होता. यात ही माहिती समोर आली आहे. ठाकरे यांच्या शपथविधीतील सर्वाधिक खर्च हा विद्युतीकरणासाठी होता असे राजभवन कार्यालयाने दिलेल्या माहिती वरून समोर आले आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते निखिल रवींद्र चनशेट्टी युती सरकारच्या सत्ता स्थापनेच्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मध्ये वानखेडे स्टेडियममध्ये जेव्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. तेव्हा शपथविधीचा खर्च होता 98 लाख 37 हजार रुपये. तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा शपथविधीचा खर्च होता २ कोटी ८९ लाख रुपये. पाच वर्षांत शपथविधीच्या खर्चात झालेली वाढ लक्षणीय मानली जात आहे. गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्री शपथविधीच्या खर्चात जवळपास 3 पट वाढ झाली असल्याचे राजभवनाने दिलेल्या खर्चाच्या तपशिलावरून स्पष्ट होत आहे.
https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/5737796_aura.jpg फडणवीस यांच्या शपथविधीसाठी निमंत्रण पत्रिका पाठविण्याचा खर्च 2 हजार 680 रुपये होता. फाइल, फोल्डर इत्यादीचा खर्च 1 हजार 440 रुपये होता आणि सुरक्षेच्या कारणासाठी 72 हजार 500 रुपये खर्च झाला होता. तेव्हा विद्युतीकरणावर झालेला खर्च 30 लाख 60 हजार 670 रुपये होता आणि शामियाना आणि इतर खर्चात 67 लाख 660 रुपये खर्च झाला होता. उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील शपथविधी सोहळ्याचा पुष्पसजावटीवर 3 लाख 3 हजार 257 रुपये खर्च झाले. तर विद्युतीकरणाच्या कामासाठी 2 कोटी 76 लाख 4117 रुपयांचा खर्च झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला तब्बल 2 कोटी 89 लाखांचा खर्च, आरटीआयमधून उघड