छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर असेच ठेवा अशी मागणी होत असताना मात्र विदेशी पाहुणे माघारी जाताच अवघ्या काही दिवसांमध्ये काही चोरांनी सजावटीसाठी लावलेल्या वस्तूंची चोरी करायला सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले. आतापर्यंत झाडांच्या 213 कुंड्या आणि 25 फोकस लाईट चोरून नेल्याचे समोर आले आहे, त्यामुळे नागरिकांना शहर चांगले राहणार कसे असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
जी 20 परिषदेचे आयोजन : गेल्या एक महिन्यापासून शहराचा चेहरा मोहरा बदलण्यात आला. जी 20 महिलांची परिषद 27 आणि 28 फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे पार पडली. या परिषदेसाठी मागील काही महिन्यांपासून शहराची असलेली दुरावस्था चांगली करण्याचे काम करण्यात आले. इतकच नाही तर शहराच्या मुख्य रस्त्यांवर शोभिवंत अशा वस्तू ठेवण्यात आल्या. त्यात झाडाच्या कुंड्या वेगवेगळे लाईट, विशेष अशा पद्धतीने नियोजन करत आकर्षक असे रूप शहराला देण्यात आले.
शोभिवंत कुंड्यांचा वापर :शहरातील विमानतळपासून जालना रस्त्याला असणाऱ्या सर्व आस्थापने, हर्सूल, ताज हॉटेल, शहरातील जुना भाग असे सर्व मिळून बाराशे शोभिवंत झाडांच्या कुंड्या ठेवण्यात आल्या. काही ठिकाणी असलेल्या झाडांवर आकर्षक रोषणाई करण्यासाठी फोकस लाईट लावण्यात आली. त्यामुळे शहरात रात्री फिरताना सेल्फी काढणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली होती. रात्रीच्या सुमारास शहर शांत आणि सुंदर दिसत होते. त्यामुळे अनेक जण रात्रीची सैरसफर करायला देखील बाहेर पडताना दिसत होते.