औरंगाबाद - महापालिकेने तीन वर्षांपूर्वी 'वॉटर युटिलिटी' या खासगी कंपनीला पाणी पुरवठा आणि पाणीपट्टी वसुलीचे काम दिले होते. दररोज पाणी देण्याच्या अटीवर अकराशे रुपये असणारी पाणीपट्टी थेट चार हजारांवर नेण्यात आली होती. 2016 मध्ये हा करार रद्द करण्यात आला, मात्र पाणी पट्टी मात्र वाढीवच आकारली जात आहे. आता नियमित पाणीपुरवठा होत नसूनही शहरातील नागरिक राज्यात सर्वाधिक पाणीपट्टी भरत आहेत. त्यामुळे औरंगाबादकरांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
नियमित पाणीपुरवठा करणाऱ्या पुणे महापालिकेची वार्षिक पाणीपट्टी जवळपास चौदाशे रुपये आहे. मात्र, औरंगाबाद शहरात नागरिकांना महापालिकेत 4050 रुपये पाणीपट्टी द्यावी लागते. शहरात सध्या दर सहा दिवसाला 40 ते 50 मिनिटांसाठी पाणीपुरवठा केला जातो. शहरात जवळपास दोन लाखांहून अधिक पाणीपट्टी भरणारे नागरिक आहेत. यासंबंधात नागरिकांच्या कृती समितीने महापालिकेसमोर निदर्शनेदेखील केली आहेत. पालिकेने पाणी पट्टी कमी न केल्यास बेमुदत आंदोलन करण्याची भूमिका नागरिकांच्या कृती समितीने घेतली आहे.