औरंगाबाद - दिवाळीच्या निमित्ताने बाजार सजले आहेत. रौशनाई करण्यासाठी ग्राहक लायटिंग खरेदी करत आहेत. यावर्षी देखील चीनी लायटिंगचाच दबदबा पाहायला मिळत आहे. देशी लायटिंगच्या विक्रीपेक्षा चीनी लायटींगची विक्री तीनपट अधिक होत आहे.
कोरोनाला चीन जबाबदार असल्याने यंदा चीनी वस्तूंच्या विक्रीत घट होईल, असा अंदाज होता. मात्र, भारतीय बनावटीची लायटिंग चीनी लायटिंगच्या तुलनेत महाग असल्याने दिवाळीत चीनी लायटिंगचा बोलबाला पाहायला मिळत असल्याचे मत व्यावसायिकांनी व्यक्त केले आहे.
प्रकार जास्त, किंमत कमी, त्यामुळे चायनीज लायटिंगला मागणी
गेल्या काही वर्षांमध्ये चीनी लायटिंगणे भारतीय बाजारपेठेत वर्चस्व निर्माण केले आहे. स्वस्त, आकर्षक आणि विविध प्रकारात उपलब्ध असल्याने चीनी लायटिंगची मागणी मोठ्या प्रमाणात असते. ३० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत आकर्षक अशी जास्त लांबीची लायटिंग उपलब्ध असते. त्यामुळे, सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी लायटिंग मिळत असल्याने चीनी लायटिंगला मोठी मागणी असते, आणि ती यावर्षी देखील कायम आहे.