मराठवाडा विभागात 37 टक्के बालविवाहांचे प्रमाण -आशा शेरखाने - कटके छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) :विवाह करताना मुलींच्या वयोमर्यादेत केंद्र सरकार बदल करण्याचा प्रस्ताव पारित करणार आहे. मात्र दुसरीकडे बालविवाहात मराठवाडा अग्रणी ठरतोय. जुन्या नियमांच्या अंमलबजावणीत अडचणी आहे, तर नवीन नियमाचा होणार काय? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. यात बालविवाह थांबवण्यात यंत्रणा प्रयत्न करतात, मात्र नागरिकांचा प्रतिसाद कमी मिळत असल्याने हे विवाह थांबवण्यात अनंत अडचणी येतात. जर सर्व स्तरातून सहकार्य मिळाले तर निश्चित भविष्यात बालविवाह थांबवण्यात यश मिळेल असा विश्वास बालकल्याण समितीच्या अध्यक्षा आशा शेरखाने - कटके यांनी व्यक्त केले आहे.
मराठवाडा बालविवाहात अव्वल :बालविवाह प्रतिबंधक कायदा 2007 नुसार विवाहासाठी मुलाचे वय 21, तर मुलीचे वय 18 वर्षे असणे गरजेचे आहे. या वयाखालील विवाह कायदेशीर नसतात. असे असले तरी पाचव्या राष्ट्रीय कुटुंब, आरोग्य सर्वेक्षणानुसार मराठवाड्यात मात्र, सर्वाधिक बालविवाह झाल्याचं समोर आल आहे. विभागात बालविवाहांचे प्रमाण सरासरी 37 टक्के आहे. अल्पवयात आई, गर्भवती होण्याचे प्रमाणही सरासरी 13 टक्के इतके आहे. मराठवाड्यात आठही जिल्ह्यात परिस्थिती चिंताजनक आहे. त्यात सर्वाधिक बालविवाह परभणी 48, बीड जिल्ह्यात 44 होत असल्याचे निष्पन्न झाले. तर, छत्रपती संभाजीनगर 35.8, जालना 35, हिंगोली 37, लातूर 31, धाराशिव 36 टक्के, नांदेड 32 टक्के इतके बालविवाह अंदाजे वर्ष भरात होत असल्याचं अहवालातून समोर आले. त्यामुळे कमी वयात गर्भवती होण्याच्या प्रमाणामध्ये मोठी वाढ झाली आहे. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 12.4 टक्के, जालना 10, हिंगोली 14, परभणी 13, बीड 15, लातूर 14, धाराशिव 16 तर नांदेड 8 टक्के अशी ही टक्केवारी नुकतीच समोर आली आहे.
बाल विवाहाची ही आहेत कारणे :केंद्र सरकार विवाह कायद्यात बदल करण्याच्या तयारीत आहे. त्यामध्ये मुलींचे वय 18 वरून 21 करण्याचा प्रस्ताव केंद्र लवकरच आणणार आहे. असे असले तरी जुन्या नियमांची आतापर्यंत अंमलबजावणी होत नाही, तर नवीन नियमांची अंमलबजावणी होणार का? असा संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत बालकल्याण समितीने काही निष्कर्ष काढले आहेत.
1) बालविवाह होण्यामध्ये कुटुंबात असलेली गरिबी हे सर्वात मोठे कारण समोर आला आहे. अनेक दुर्गम भागात आई आणि वडील दोघेही मोलमजुरीला जातात, अशावेळी घरात असलेली मुलगी त्यांच्यासाठी चिंतेची बाब ठरते. आर्थिक परिस्थिती आणि त्यात मुलीची असलेली चिंता यातून विवाह केले जातात.
2) सोशल मीडियाच्या प्रभावातून आज एकटी असलेली मुलं आसपासच्या अपरिचित माणसाच्या संपर्कात येतात, तसे झाल्यास चुकीचे प्रकार घडू नये अशी भीती आई-वडिलांच्या मनात आहे. त्यातूनच असं काही घडण्याच्या आधीच मुलीचं लग्न लावून तिला सासरी पाठवण्याचा घाट घातला जातो.
3) कुटुंबात आई-वडील भाऊ-बहीण असे सदस्य असताना देखील सतत होणारे वाद विवाद यामुळे मुले एकटे पडतात. या एकटेपणापासून दूर होण्यासाठी मुली एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात येतात. याबाबत आई-वडिलांना संशय आला की ते लगेच तिचा विवाह लावण्याची तयारी करतात.
4) मुला मुलींमध्ये शिक्षणाची टक्केवारी वाढत असल्याचा बोलले जाते. समाजशिक्षित होत आहे असा समज होत असला, तरी ग्रामीण भागात आजही शिक्षणापासून अनेक मुलं-मुली वंचित आहेत. अतिशय दुर्गम भागात उच्च शिक्षणाची नसलेली सोय, त्यात आर्थिक परिस्थिती खराब असणे या कारणांमुळे मुली शिक्षणापासून वंचित होतात. त्यामुळे आता शिक्षण नाही, तर किमान विवाह करून मुलीला किमान संसाराला लावावे असे म्हणून विवाह ठरवला जातो. त्यात ग्रामीण भागात लग्नासाठी कमी वयाची मुलगी पाहिली जाते. त्यातूनच बालविवाह होतात. मुलं देखील जास्त शिक्षित असल्याने ते मुलीचे वय तपासात नाही. कुटुंबीय तयार म्हणून ते पण लग्नाला उभे राहतात, अशी कारणे समोर आली आहेत. मात्र, यावर जर काम केले तर नक्कीच बालविवाह थांबून शक्य होईल असे मत बालकल्याण समितीच्या अध्यक्षा आशा शेरखाने कटके यांनी व्यक्त केले.
नागरिकांनी करावी मदत :बालविवाह रोखण्याचा थांबवण्याचा प्रयत्न केला जातो. या वर्षी पहिल्या तीन महिन्यात बालकल्याण समितीकडे आलेल्या प्रकरणात नऊ बालविवाह रोखण्यात यश प्राप्त आले आहे. समोर आलेले प्रकरण शंभर टक्के थांबवले जातात, त्यांचा समुपदेशन करून विवाह का करू नये याबाबत जनजागृती केली जाते. मात्र, समाजात आजही असे विवाह लपून-छपून उरकले जातात. त्याची माहिती बालकल्याण समिती समोर येत नाही. मात्र, नागरिकांनी याबाबत आता सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. गावात पोलीस पाटील असतात मात्र, त्यांना देखील विवाहाची माहिती कळू दिली जात नाही. तक्रारी न येणाऱ्या विवाहांची संख्या अधिक आहे. त्यामुळेच गावातील प्रत्येक नागरिकाने ही आपली जबाबदारी समजून बालविवाह रोखण्यास मदत करायला हवी असे, आवाहन बालकल्याण समितीच्या वतीने करण्यात आले.
हेही वाचा - Amol Mitkari On CM : शिंदे-फडणवीस सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; आमदार अमोल मिटकरींची मागणी