औरंगाबाद -वाळूज येथील शिवाजीनगरमध्ये हौदात पडून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गौरी वैभव बगाडे असं या चिमुकलीचं नाव असून, ती तिच्या आजोबांच्या तेराव्यासाठी आली असताना ही दुर्घटना घडली.
खेळताना पडली हौदात
गौरी घरी आलेल्या लहान मुलांसोबत खेळत असताना रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमार ती अचानक बेपत्ता झाली होती. घरच्यांनी तिचा शोध घेतला असता, ती ज्या ठिकाणी खेळत होती तेथील घरमालक मंगेश हेंद्रे यांच्या घरातील धोकादायक सेफ्टी टॅंकमध्ये पडल्याने आढळून आले. जीव गुदमरल्याने तिचा मृत्यू झाला.
आजोबांच्या तेराव्याच्या कार्यक्रमासाठी आली होती गौरी
गौरीच्या चुलत आजोबांचा ३० मे रोजी १३ व्याचा कार्यक्रम असल्याने गौरी आई-वडिलांसोबत शिवाजीनगरमध्ये आली होती. घरातील सर्व लोक कामात व्यस्थ होते. गौरी घरी आलेल्या इतर चिमुकल्यांसोबत खेळत होती. मात्र खेळता-खेळता ती जिन्यालगत दोन्ही बाजुने असलेल्या अंदाजे आठ ते दहा फूट सेफ्टी टॅंकमध्ये पडली. घरमालक हेंद्रे यांच्याकडे भाड्याने राहणाऱ्या एका भाडेकरू महिलेने लहान मुलं त्या धोकादायक खड्ड्या जवळ खेळत असल्याचे नागरिकांना व नातेवाईकांना सांगितले. त्यानंतर नातेवाईकांनी तात्काळ पाणी उपसणाऱ्या वाहनाला पाचारण केले. पुढे मोटारीच्या मदतीने आतील दुर्गंधीयुक्त पाणी बाहेर काढण्यास सुरुवात झाली, अवघ्या २० मिनिटांमध्ये गौरी पाण्यात आढळून आली. तिला पाण्याबाहेर काढताच तिच्या आई-वडिलांनी व नातेवाइकांनी हंबरडा फोडला. गौरीला पोलिसांच्या मदतीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले.
वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
दुर्घटना घडली त्या इमारतीमध्ये घर मालक मंगेश हेंद्रे यांच्या तब्बल २९ खोल्या आहेत. तळ मजल्यावर जिन्याजवळ दोन्ही बाजूने कायम उघड्या अवस्थेत असणारे दोन खड्डे आहेत. याठिकाणी पूर्वी पिण्याच्या पाण्याचा हौद असल्याचे हेंद्रे यांनी सांगितले, मात्र काही महिन्यांपूर्वी या ठिकाणी ड्रेनेजचे घाण पाणी येत असल्याने हौदाचा वापर बंद केला होता. त्यानंतर त्यात दुर्गंधीयुक्त पाणी साचतच गेले, आणि त्याच ठिकाणी पडून गौरीचा मृत्यू झाला. या प्रकरणी वाळूज पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा -येत्या जूनमध्ये सीरम पुरवणार देशाला 9 ते 10 कोटी डोस