औरंगाबाद- लग्नाच्या पहिल्याच रात्री घरातील सोने, चांदी आणि रोख रक्कम घेऊन फरार झालेल्या नवरीला पोलिसांनी अटक केली आहे. पैठण पोलिसांनी परभणी येथे विशेष तपास पथक पाठवत ही कारवाई केली. त्यामुळे लग्न करून पैसे लुबाडणारी टोळी सक्रिय असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या संदर्भात पैठण पोलिस ठाण्यात आपली सून हरवल्याची तक्रार सासू सुनंदा वंसारे यानी दिली होती.
लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरी पसार..
शहरातील लक्ष्मीनगर येथील एका विधवा महिलेच्या मुलाचे आठवठाभरापुर्वी उषा पवार (वंसारे) हिच्याशी लग्न झाले. लग्नाच्या पहिल्याच दिवशी नवरी घरातील सोने, चांदी आणि 50 हजार रुपयांची रक्कम घेवून फरार झाली. यासंदर्भात पैठण पोलीस ठाण्यात उषा पवार बेपत्ता असल्याची तक्रार सासू सुनंदा वंसारे यांनी दाखल केली. घटनेची सविस्तर माहिती मिळवल्यानंतर बनावट लग्न लावून फसवणूक करणारी टोळी सक्रिय असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि आरोपींना अटक केली. दरम्यान उषा पवार व इतर संशयित आरोपींवर भादंवि कलम ४२०, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पैठण पोलीस करत आहेत.