औरंगाबाद:मराठवाड्यातील शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे नेहमीच त्रस्त झालेला पाहायला मिळाला. होत असलेले नुकसान पाहता सरकारी योजनांचा फायदा देखील त्यांना मिळत नाही. त्यामुळे शेतीपूरक व्यवसाय करावा याकडे त्यांचा कल वाढला आहे. मात्र त्यातही त्यांची फसवणूक होत आहे. करमाड तालुक्यात शिंपल्यांची शेती करून आर्थिक उत्पन्न वाढवण्याचे आमीष इंडो पर्ल कंपनीचे मालक अरुण अंभोरे यांनी दाखवले. 13 महिन्यांचा करार करून शेतात आलेले मोती विकत घेऊन, त्याचा मोबदला देण्यात येईल असे सांगण्यात आले. त्यावरून शेतकऱ्यांनी कर्ज काढून गुंतवणूक केली. करार संपायच्या आधी कंपनीच्या लोकांनी आलेले शिंपले काढून घेतले. त्यात खराब झालेले शिंपले तिथेच टाकून चांगले शिंपले आपल्या ताब्यात घेतले. त्यावेळी पैसे कधी मिळणार अशी शेतकऱ्यांनी विचारणा केली असता, तयार मोती हैदराबादला पाठवले जातील. त्यानंतर तुमचा मोबदला तुमच्या खात्यात जमा होईल, असे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात मोबदला आलाच नाही. त्यामुळे मोतीही गेले आणि पैसेही अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली.
शेतकऱ्यांची पोलिसात धाव:शेतकऱ्यांची करार करताना चांगले मोती 180 रुपये दराने घेतले जातील असे सांगण्यात आले. तसेच खराब झालेले मोती 81 रुपये प्रति याप्रमाणे दर निश्चित करण्यात आला. खराब झालेल्या मालाबाबत आपण विमा काढला आहे, त्यामुळे नुकसान झाले तरी शेतकऱ्यांना त्याचा फटका बसणार नाही असे कंपनीकडून सांगण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी डोळे झाकून आर्थिक उत्पन्न वाढावे याकरिता गुंतवणूक केली. मात्र प्रत्यक्षात मोबदला मिळालाच नाही. इतकेच नाही तर कंपनीच्यावतीने देण्यात आलेले धनादेश देखील खात्यात वटले नाही. त्यामुळे आर्थिक फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी करमाड पोलिसात धाव घेतली. अनेक चकरा मारल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र आरोपी अरुण अंभोरे याला पकडण्यात पोलिसांना अद्याप यश मिळाले नाही.
कोट्यावधींचा घोटाळ्याची शक्यता:करमाड तालुक्यात भगवान पवार या शेतकऱ्याने सर्वांत पहिले आपली तक्रार नोंदवली. ती तक्रार मागे घेण्यासाठी कंपनीचे मालक अरुण अंभोरे यांनी त्यांच्यावर धमकी देत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र न्यायासाठी त्यांनी आपली तक्रार मागे घेतली नाही. अटकपूर्व जामीन मिळावा याकरिता अंभोरे यांनी न्यायालयात धाव घेतली. सरकारी वकील योग्य बाजू मांडत नसल्याने तक्रारदार भगवान पवार यांनी पदरचे पैसे टाकून खासगी वकिलामार्फत न्यायालयात आपली बाजू मांडली. न्यायालयाने अंभोरे याचा जामीन अर्ज फेटाळला. तक्रारदाराला नुकसान भरपाई देणार नाही, तोपर्यंत जामीन मंजूर केला जाणार नाही असे न्यायालयाने सांगितले. तरीदेखील आरोपी न्यायालयाला जुमानण्यास तयार नाही. इतकच नाही जामीन फेटाळला गेला असला तरी आरोपी पोलिसांच्या हाती लागत नाही. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांनी शंका व्यक्त केली आहे.