औरंगाबाद -जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता 'ब्रेक द चेन' अंतर्गत लावलेल्या कडक निर्बंधांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार किराणा दुकान, भाजी मंडई, गॅस सिलिंडरचा पुरवठा, दूध डेअरी आदी आवश्यक सेवा सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. पूर्वी ही वेळ सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत होती.
रस्त्यावरील गर्दी पाहता नवे निर्बंध -
नव्या निर्बंधांसाह लावण्यात आलेल्या बंदमध्ये भाजीपाला विक्री, किराणा दुकाने, दूध डेअरी आदी अत्यावश्यक सेवेत समावेश करण्यात आला आहे. नागरिकांना त्रास होऊ नये आणि गर्दी टाळण्यासाठी अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यात परिस्थिती लक्षात घेऊन या वेळांमध्ये बदल करण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार रस्त्यावरील गर्दी पाहता नवे निर्बंध लावण्यात आले आहेत.
असे असतील नवीन नियम -
किराणा, भाजीपाला, फळे, डेअरी, बेकरी, मिठाई दुकाने, खाद्यपदार्थांची दुकाने पार्सलसेवा, चिकन, मटण, अंडी, मासे, पोल्ट्री दुकाने, गॅस सिलिंडर पुरवठा, ॲटोमोबाईल्स दुकाने, गॅरेज आदी अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंतच खुली ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला असून हा आदेश संपूर्ण जिल्ह्यासाठी लागू राहील. सर्वसामान्य नागरिकांना दुपारी १ वाजेपर्यंत पेट्रोल पंपावर पेट्रोल-डिझेल मिळणार आहे. नव्या आदेशानुसार जिल्ह्यात आठवडी बाजार भरवण्यावर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे.
या सुविधा राहणार सुरू -
ऑप्टीकल्स–चष्मा दुकाने, पशुवैद्यकीय दवाखाने, पाळीव प्राणी संगोपन केंद्र, पाळीव प्राणी, पशुखाद्याची दुकाने, पाळीव प्राण्यांची सेवा देणारी दुकाने, कृषी संबंधित सेवा सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. आरोग्य सेवा, वीज, पाणी, बँकींग, वित्तीय सेवा, आपत्ती व्यवस्थापन कार्यालयात १०० टक्के उपस्थिती राहील. स्थानिक प्राधिकरणाच्या अत्यावश्यक सेवा २४ तास सुरू राहतील. इतर शासकीय कार्यालयांत ५० टक्के उपस्थिती राहील. खासगी कार्यालये बंद राहतील. मुस्लीम बांधवाचा रमजानचा महिना लक्षात घेऊन दूध व फळे यांच्याशी संबंधित दुकाने सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत याच वेळेत सुरू राहणार आहेत.
हेही वाचा - राष्ट्रीय आरोग्य आणीबाणी घोषित करा; कपिल सिब्बल यांची मागणी