औरंगाबाद - शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्वाचा मुद्दा सोडला असून, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जागी आता वंदनीय बाळासाहेब ठाकरे झाल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. ते औरंगाबादमध्ये बोलत होते. ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यांना घेऊन शिवसेना आमच्या सोबत होती, तो मुद्दा सेनेने सोडल्याचे पाटील म्हणाले. तसेच आगामी औरंगाबाद महानगर पालिका निवडणुकीत आम्ही स्वतंत्र लढणार असल्याचे संकेतही पाटील यांनी दिले.
औरंगाबादच्या भाजप विभागीय बैठकीत चंद्रकांत पाटील बोलत होते. महानगर पालिकेची निवडणूक ५ महिन्यांनी होणार आहे. या निवडणुकीत आता भाजप लोकांच्या हितासाठी स्वतंत्र लढण्याची तयारी करत असल्याचे पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटलांचा सेनेवर निशाणा राज्यात महायुतीत बिघाडी झाल्याने नव्या समीकरणाचा जन्म झाला. या नव्या समीकरणामुळे आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील युतीत बिघाडी झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तसे संकेत दिले आहेत. शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्वाचा मुद्दा सोडला असून, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जागी आता वंदनीय बाळासाहेब ठाकरे झाल्याची टीका त्यांनी औरंगाबादमध्ये केली.
औरंगाबाद महानगर पालिकेत गेल्या ३ वर्षांपासून शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे. ५ वर्षांच्या कार्यकाळात शिवसेना आणि भाजप महापौरपद वाटून घेत पालिकेच कामकाज पाहत होती. मात्र, राज्यात सत्तासमिकरण बदलले आणि ३० वर्षे जुनी युती क्षणात मोडली. त्यामुळे आगामी औरंगाबाद महानगर पालिका निवडणुकीत भाजप स्वबळावर निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. इतकंच नाही तर त्याबाबत आता रणनीती देखील आखली जात आहे.