महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवसेनेच्या 'या' नाऱ्यामुळेच केंद्राने राम मंदिर बांधण्याची घाई केली - चंद्रकांत खैरे - चंद्रकांत खैरे राम मंदिर उभारणी मत

विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला जाऊन पूजन केले. त्यावेळी 'पहले मंदिर फिर सरकार', अशी घोषणा शिवसेनेचे प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती. त्या घोषणेमुळेच केंद्र सरकारला मंदिर उभारणीसाठी घाई करावी लागली, असे मत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केले.

Chandrakant Khaire
चंद्रकांत खैरे

By

Published : Aug 5, 2020, 5:00 PM IST

औरंगाबाद - अयोध्येत राम मंदिरांचे भूमीपूजन झाल्याने बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण होत आहे. 'पहले मंदिर फिर सरकार' या शिवसेनेच्या घोषणेमुळेच केंद्र सरकारला मंदिर बांधण्याची घाई करावी लागली. त्यामुळेच आजचा आनंदाचा दिवस उजाडला असल्याचे मत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केले.

शिवसेनेच्या 'पहले मंदिर फिर सरकार' या नाऱ्यामुळेच केंद्राने मंदिर बांधण्याची घाई केली

आजच्या भूमिपूजनात राम मंदिराच्या निर्मितीसाठी प्रयत्न केलेल्या लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी यांच्यासह अनेक जणांना निमंत्रित करण्यात आले नाही. आम्हाला नाही मात्र आमच्या नेत्यांना तरी निमंत्रित करायला हवे होते. मात्र, कोणत्याच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिले नसल्याचे कारण देत शिवसेनेलाही कार्यक्रमाला बोलावले नाही. सर्वांना माहिती आहे की, राम मंदिर उभारणीच्या लढ्यात शिवसेनेचा मोठा वाटा आहे, असेही चंद्रकांत खैरे म्हणाले.

आज राम मंदिराची निर्मिती सुरू होत आहे. श्रीरामचंद्राच्या हातात धनुष्यबाण आहे त्यामुळे आमच्यासारख्या धनुष्यबाणाला मानणार्‍या अनेकांना त्याचा आनंद आहे. 1992 ला मी आमदार असताना शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला आदेश दिले. त्यानंतर आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना घेऊन आयोध्येकडे निघालो. रस्त्यात पोलिसांनी अडवले. दरम्यान, बाबरी पाडल्याची बातमी आमच्या कानावर पडली. आम्ही आनंदी झालो आणि तिथेच जल्लोष साजरा केला. त्यानंतर कसे बसे अयोध्येला जाऊन रात्री तीन वाजेपर्यंत मलबा उचलायचे काम केले. त्या ठिकाणी जी रामाची मूर्ती आहे ती आम्ही आमच्या हाताने स्थापन केली होती. त्यामुळेच आज अयोध्येमध्ये राम मंदिराची पायाभरणी होत असल्याचा मोठा आनंद आहे, असे चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.

राम मंदिरासाठी अनेक वेळा आंदोलने केली. खासदार असताना या विषयी लोकसभेत प्रश्न केले. लालकृष्ण अडवाणी यांनादेखील अनेक वेळा राम मंदिर उभारणीबाबत प्रश्न विचारले होते. ज्यावेळी आपल्याकडे बहुमताचे सरकार असेल त्यावेळेस आपण मंदिर उभारणी करू, असे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाले. नरेंद्र मोदींनाही हाच प्रश्न विचारला. त्यावेळेस नरेंद्र मोदी यांनी न्यायालयीन प्रक्रिया पार पडल्यावर आपण निश्चित मंदिर उभारू असे आश्वासन दिले होते. विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला जाऊन पूजन केले. त्यावेळी 'पहले मंदिर फिर सरकार', अशी घोषणा शिवसेनेचे प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती. त्या घोषणेनंतर केंद्र सरकारला मंदिर उभारणीसाठी घाई करावी लागली, असे चंद्रकांत खैरे म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details