औरंगाबाद - चंद्रकांत खैरे यांनी आज पाचव्यांदा लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरला. यानंतर खैरे यांच्या प्रचारार्थ भव्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक क्रांती चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून सुरू झाली आणि संस्थान गणपतीपर्यंत काढण्यात आली.
औरंगाबादेतून चंद्रकांत खैरेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज, पाचव्यांदा उतरणार निवडणुकीच्या रिंगणात - चंद्रकांत खैरे
चंद्रकांत खैरे यांनी आज पाचव्यांदा लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरला. यावेळी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे, हरिभाऊ बागडे यांच्यासह अर्जुन खोतकर, विनोद घोसाळकर, भागवत कराड यांच्यासह सेना-भाजपचे आमदार उपस्थित होते.
दुपारी एक वाजण्याच्या सुमारास चंद्रकांत खैरे शिवसेना-भाजप पदाधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. युतीचा उमेदवार म्हणून अर्ज सादर करताना आदित्य ठाकरे, हरिभाऊ बागडे यांच्यासह अर्जुन खोतकर, विनोद घोसाळकर, भागवत कराड यांच्यासह सेना-भाजपचे आमदार उपस्थित होते.
अर्ज भरल्यानंतर, पुन्हा मीच जिंकणार असून सेनेचा गड राखणार, असा विश्वास खैरे यांनी व्यक्त केला. तसेच १२ ते २ वाजेपर्यंत मुहूर्त असल्याने खुलताबाद येथील भद्रा मारोतीचे दर्शन घेऊन त्यांनी अर्ज दाखल केला असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी आदित्य ठाकरे या मिरवणुकीत सहभागी झाले नाहीत. मात्र, २ एप्रिलला ठाकरे शहरात रोड शो करत युवकांशी संवाद साधणार असल्याची माहिती शिवसेनेने दिली आहे.