औरंगाबाद - उद्धव ठाकरे मला काहीना काही देतील, त्यांनी मला तसा शब्द दिलाय, नैराश्य आहे पण शिवसेना सोडणार नाही, मरेन तर भगव्यातच, अशी भावूक प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे. गेल्या वर्षी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन प्रवक्ता म्हणून, शिवसेनेत सामील झालेल्या प्रियांका चतुर्वेदी यांना गुरुवारी शिवसेनेने राज्यसभा उमेदवार म्हणून जाहीर केले.
"राज्यसभा उमेदवारी न मिळाल्याने मी निराश पण शिवसेना सोडणार नाही" हेही वाचा -काँग्रेस जुन्यांच्याचं कोंडाळ्यात! नव्या नेतृत्त्वाला संधी द्यावी - शिवसेना
राज्यसभा उमेदवारी न मिळाल्याने खैरे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. खैरे यांना राज्यसभेची खासदारकी दिली जाईल, अशी अपेक्षा मराठवाड्यातील शिवसैनिकांना होती. मात्र, ऐनवेळी प्रियांका चतुर्वेदी यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नाराज झालेले खैरे म्हणाले, की कोणी काहीही म्हणो, मी शिवसेना सोडून जाणार नाही. भाजपने भागवत कराड यांना उमेदवारी दिल्याची बाब मला खटकली असल्याचेही खैरे यांनी म्हटलंय.
"मी लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्याने मला राज्यसभेची उमेदवारी मिळावी, अशी शिवसैनिकांची इच्छा होती. मात्र, उद्धव ठाकरे माझं पुनर्वसन जरूर करतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. नवीन लोकांना संधी दिली पाहिजे पक्ष वाढीसाठी काही निर्णय घ्यावे लागतात. मी शिवसेना स्थापन झाल्यापासून पक्षात आहे. मला पक्षाने बरचं दिल आहे. उद्धव ठाकरे निश्चित मला काही तर चांगलं देतील. अनेक लोक अफवा पसरवतात मी कुठेही जाणार नाही. मी मरणार तर भगव्यातच!"
- चंद्रकांत खैरे (शिवसेना नेते)