औरंगाबाद -अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात यावर्षी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कापूस, मका आणि सोयाबीन या पिकांसह फळबागेचे नुकसान झाले आहे. राज्यसरकारने पाहणी केल्यानंतर केंद्राचे सहा जणांचे पथक मराठवाड्यात दाखल झालं आहे. तीन जणांचं एक पथक औरंगाबाद तर एक पथक उस्मानाबाद जिल्ह्यातील पीक नुकसानीचा आढावा घेत आहे.
औरंगाबादच्या नऊ गावांमध्ये पथकाची पाहणी
केंद्राच्या तीन सदस्यीय पथकाने औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, गंगापूर आणि औरंगाबाद तालुक्यातील नऊ गावांमध्ये पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांकडून नुकसानग्रस्त पिकांचा आढावा घेण्यात आला. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर आणि जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, तहसीलदार, तलाठी यांनी पथकाला अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची माहिती दिली. तसेच या पथकाने शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
मराठवाड्यातील 36 लाख शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत
यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांनी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना भेटी देऊन, नुकसानाची पाहाणी केली होती. त्यानंतर तब्बल दोन महिन्यानंतर नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्राचे पथक मराठवाड्यात दाखल झाले आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कोट्यामधून शेतकऱ्यांना मदत मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान मराठवाड्यातील 36 लाख शेतकरी अद्याप मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
राज्या सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केली मदत
राज्य सरकारने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची नुकसानभरपाई म्हणून 10 हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. यामध्ये पिकांचे नुकसान, रस्ते, विहिर यांच्या नुकसानाचा समावेश आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांना 10 हजार रुपयांची तर बागायतदार शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. काही शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे. तर अद्यापही अनेक शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील केंद्रीय पथक पाहणी दौऱ्याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.
केंद्रीय पथकाचा पाहणी दौरा