गावकऱ्यांनो सावधान..! ग्रामीण भागात आता ड्रोन कॅमेरा ठेवणार नजर - पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन केले असताना, अनेक लोक विनाकारण बाहेर पडत आहेत. बाहेर फिरत असताना पोलीस दिसताच पळवाट बघून ही लोक लपून बसतात. अशा लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याच्या वापर केला जात आहे.
औरंगाबाद - ग्रामीण भागात रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही. अनावश्यक फिरणाऱ्या लोकांवर ड्रोन कॅमेऱ्याने नजर ठेवण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी प्रत्येक तालुक्यात ड्रोन कॅमेरे तैनात केले असून, त्यामुळे प्रत्येक भागावर लक्ष ठेवणे सोपे झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन केले असताना, अनेक लोक विनाकारण बाहेर पडत आहेत. बाहेर फिरत असताना पोलीस दिसताच पळवाट बघून ही लोक लपून बसतात. अशा लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याच्या वापर केला जात आहे.
ड्रोन पेट्रोलिंगच्या माध्यमातून जिल्ह्यातील 23 पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सर्वच गावांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. महामार्ग, धार्मिक स्थळ, बाजार पेठांवर, नागरीवस्तीत पोलीस गस्त सुरू आहेत. पोलीस आणि जिल्हा प्रशासन नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन करत असताना, अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर फिरत आहेत. नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. मात्र, अनेकांना अद्याप या आजाराचे गांभीर्य नसल्याने ते कोणते ना कोणते कारण काढून घराबाहेर पडत आहेत. अशा लोकांवर कारवाई करण्याच्या अनुषंगाने ड्रोन पेट्रोलिंग सुरू करण्यात आली आहे. नागरिकांना मदत लागल्यास 9923787887 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले आहे.