औरंगाबाद -शहरात डेंग्यूच्या कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. बळींची संख्या 11 वर पोहोचली आहे. शहरात 50 रुग्ण आढळले असून 180 संशयित रुग्ण आहेत. याप्रकरणी गंभीर दखल घेत महापौर नंदकुमार घोडेले यांनी आज(18 नोव्हेंबर) आरोग्य विभागाची बैठक घेतली. यावेळी त्यांनी शहरात डेंग्यूवर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मनपाच्या आरोग्य विभागामार्फत डेंग्यूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी अॅबेटिंगची विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. दररोज राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेची आज महापौर घोडेले यांनी पाहणी केली. दरम्यान, अनेक घरांमध्ये डेंग्यूच्या आळ्या आढळून आल्या. खासगी रुग्णालयातील संशयित डेंग्यूच्या रुग्णांची माहिती मिळत नसेल तर त्या रुग्णालयांचा परवाना रद्द करण्याचे आणि दररोजचा अहवाल सादर करण्याचे आदेश घोडेले यांनी या बैठकीत दिले आहेत. आरोग्य विभागाने झोननिहाय तपासणी करून भिमनगर, भावसिंगपूरा, हर्सुल-मिसारवाडी, पानदरीबा-ज्योतीनगर हे चार भाग रेड झोन असल्याचे जाहीर केले आहे. या भागात डेंग्यूचा सर्वाधिक धोका असल्याचे सांगण्यात आले आहे.