छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):नामांतराच्या मुद्द्यावरून विरोधात एमआयएम पक्षातर्फे साखळी उपोषण सुरू करण्यात आले, तर दुसरीकडे समर्थनार्थ मनसेतर्फे स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. मात्र त्याचवेळी चिकलठाणा परिसरात एका चौकाच्या फलकावर अज्ञात लोकांनी रात्रीच्या वेळी आलमगीर औरंगजेब चौक असे नाव लिहिले. त्यामुळे शहरात पुन्हा एकदा वातावरण तापण्याची चिन्हे निर्माण झाली. मात्र पोलिसांनी वेळीच ते नाव मिटवून वाद होण्याआधीच तो क्षमावला. त्यामुळे आगामी काळात नामांतराच्या मुद्द्यावरून शहरात जातीय तेढ वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
औरंगजेबाचा फोटो लावल्याने वाद:शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर केल्यानंतर एक आठवड्यानी एमआयएम पक्षाने नामांतर विरोधी आंदोलनाला सुरुवात केली. खासदार इम्तियाज जलील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या आंदोलनात दुपारच्या वेळी काही कार्यकर्त्यांनी राजा औरंगजेबाचे पोस्टर हातात घेऊन घोषणाबाजी केली. त्यामुळे शहरातील सुरू असलेला आंदोलन वेगळ्या चर्चेत आले. अत्याचारी राजाचा फोटो घेऊन काय सिद्ध करत आहे अशी टीका सोशल मीडियावर व्हायला सुरुवात झाली. मात्र त्यावर खासदार जलील यांनी स्पष्टीकरण देत कोणीतरी खोडसाळपणे आंदोलनात हातात फोटो घेऊन युवकांना पाठवले असल्याचे सांगितले. आंदोलनाचा मोठा परिणाम झाला असता म्हणून मुद्दामहून कोणीतरी हे कृत्य केले. मात्र आमच्या लक्षात ही बाब आल्यावर, आम्ही त्या युवकाला आंदोलनातून बाहेर काढले, असे इम्तियाज जलील यांनी सांगितले. त्यानंतर रविवारी सिटी चौक पोलिसांनी औरंगजेबाचा फोटो घेऊन आंदोलनात येणाऱ्या अज्ञात चौघांवर गुन्हा दाखल केला.