औरंगाबाद- हेल्मट न घातल्याने माझ्या मुलाला का थांबवले असे म्हणत, कर्तव्य बजावणार्या शहर वाहतूक शाखेच्या कर्मचार्याची गच्ची धरुन, शिवीगाळ करुन अपहरण केल्याची घटना मंगळवारी (दि. 19 नोव्हें.) घडली. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्यापैकी शेख आसिफ शेख मुख्तार (वय. 22 वर्षे, रा. देवळाई, बीड बायपास, सातारा परिसर) याला अटक करण्यात आली आहे.
शहर वाहतुक शाखेचे पोलीस नाईक लक्ष्मण शेषराव थोटे (वय 48 वर्षे) हे 19 नोव्हेंबरला रात्री 9 वाजेच्या सुमरास कार्तिकी सिग्नल जवळ कर्तव्य बजावत होते. त्यावेळी बाबा पेट्रोलपंपाकडून चारचाकी (क्र. एमएच 20 सीडी 8055) आली. कारमधून एक महिला व तीन व्यक्ती उतरले व थोटे यांच्याकडे गेले. कारमधून आलेल्या महिलेने तु माझ्या मुला-मुलीला हेल्मेट नसल्याने का थांबवले, असे म्हणत त्यांची कॉलर पकडून शिवीगाळ केली. तसेच थोटे यांना आयुक्तांकडे चल म्हणत धमकी देत बळजबरी कारमध्ये बसविले व गरमपाणी येथे एका घराकडे आणले. हा सर्व प्रकार उपस्थित नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केला. त्यानंतर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला.