छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरून नामांतर विरोधी कृती समितीतर्फे शहरात आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. गेल्या सहा दिवसांपासून साखळी आंदोलन केल्यानंतर गुरुवारी सायंकाळी कॅन्डल मार्च काढत आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय ते भडकल गेट या मार्गावर हा मोर्चा काढण्यात आला. हातामध्ये इलेक्ट्रॉनिक मेणबत्ती घेत नामांतराला नागरिकांनी विरोध केला.
हातात मेणबत्त्या घेऊन आंदोलन : केंद्र सरकारच्या वतीने शहराचे नामांतर करून छत्रपती संभाजीनगर असे नाव देण्यात आले. त्यानंतर एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी त्याच्यावर आक्षेप घेत तुम्ही पूर्ण प्रक्रिया राबवली का? असा प्रश्न उपस्थित केला. इतकच नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला सुरुवात देखील केली. आंदोलन दरम्यान सलग सहा दिवस वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन केंद्र सरकार कसे चुकीचे आहे, याबाबत खासदार जलील यांनी टीका केली. त्याचबरोबर आंदोलनाचे वेगवेगळे टप्पे करण्यात आल्याचं त्यांनी सांगत गुरुवारी कॅन्डल मार्च शुक्रवारी शहर बंद ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. त्याला प्रतिसाद म्हणून गुरुवारी सायंकाळी मोठ्या प्रमाणात कॅण्डल मार्चमध्ये नामांतराला विरोध असणाऱ्या नागरिकांनी सहभाग नोंदवला.