औरंगाबाद - कन्नडहून शिरपूरकडे जाणाऱ्या बसला अडवून चालकासह वाहकाला बेदम मारहाण करणाऱ्या १८ जणांविरोधात कन्नड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बसने एका चारचाकीला हूल दिल्याचे कारण देत ही मारहाण करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, औरंगाबाद येथून शिरपूरकडे एसटी बस निघाली. दरम्यान औरंगाबाद नाशिक रस्त्यावरील हॉटेल आम्रपालीजवळ बसने मारुती स्विफ्ट कारला हूल दिल्याचे कारण करून लोकांनी कन्नड येथे अण्णाभाऊ साठे चौकाजवळ या बसला(एमएच २० बीएल २६७२) अडविले. त्यांनतर चालकासह वाहकाला काठीने व लाथाबुक्क्याने मारहाण करत बस चालकाच्या खिशातील मोबाईल काढून घेतला. तसेच, बस वाहकाच्या हातातील ६ हजार १६५ रुपयेही भांडणादरम्यान हिसकावून घेतले. काठीने बसच्या समोरील काचा फोडून शासकीय मालमत्तेचे नुकसान करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला.