औरंगाबाद - पैठण शहर परिसरातील गोदावरी नदीच्या पात्रातून बेसुमार वाळू चोरी करणाऱ्या १४ बैलगाड्या पोलिसांनी पकडल्या आहे. यामध्ये २८ बैल, १४ बैलगाड्या व वाळू असा एकूण १० लाख, २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पैठणमध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या बैलगाड्या जप्त पैठण शहरात सध्या बैलगाडीने मोठ्या प्रमाणात रोज वाळू चोरी सुरू आहे. झटपट पैसे, अधिकचे उत्पन्न मिळत असल्याने शिक्षित, बेरोजगार तरुण या धंद्यात उतरले आहेत. पैठणचे पोलीस निरीक्षक भागीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आयटीआय कॉलेजच्या पाठीमागे गोदावरी नदी पात्रात जाऊन ही कारवाई केली.
मागील अनेक दिवसापासून मोठया डंपरद्वारे गोदावरी पत्रातून वाळूचा अवैध उपसा सुरू होता. रोज सुमारे 20 ते 30 वाहनाद्वारे वाळूची चोरटी वाहतूक करण्यात येत होती. मात्र, पोलीस आणि महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगरल्याने वाळू माफियांनी आता बैलगाडी व इतर छोटमोठे वाहनाचा उपयोग सुरू केला आहे. या बैलगाड्यांवर देखील पोलिसांनी कारवाई केल्याने वाळू माफियाचे धाबे दणाणले आहे.
याप्रकरणी १८ जणांविरूद्ध पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर १२ बैलगाडी चालक, मालकास अटक करण्यात आली आहे. कारवाई दरम्यान, काही जण बैलगाड्या पात्रात सोडून पळून गेले. पहिल्यांदाच पैठण पोलिसांनी बैलगाडीने वाळू चोरी करणाऱ्यां विरोधात कडक कारवाई केली आहे. मात्र, अजूनही छुप्या पद्धतीने रात्रीच्या अंधारात अनेक डंपरद्वारे गोडपत्रातून वाळूची चोरटी वाहतूक केली जात आहे.