छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : भारत राष्ट्र समिती महाराष्ट्रात पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. बीआरएस पक्षाचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव हे 24 एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दाखल होणार आहेत. आमखास मैदान येथे सायंकाळी त्यांच्या जाहीर सभेचे नियोजन करण्यात आले. गेल्या काही वर्षात पक्षाने तेलंगणा येथे केलेले काम चर्चेत आहेत. त्याचा फायदा घेत महाराष्ट्रात देखील पक्षाला चांगला प्रतिसाद मिळेल, असे मत पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केले आहे.
हैद्राबादचा दुसरा पक्षही महाराष्ट्रात :2014 निवडणुकीपूर्वी हैदराबाद येथील एमआयएम पक्षाने नांदेडमार्गे महाराष्ट्रात एन्ट्री केली होती. त्यावर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी नांदेड महापालिकेमध्ये जोरदार प्रदर्शन करत महाराष्ट्रात एन्ट्री केल्याचे दाखवून दिले होते. यानंतर या पक्षाचे आज घडीला महाराष्ट्रात दोन आमदार आणि एक खासदार निवडून आले आहेत. त्याच धर्तीवर आता हैद्राबाद येथील दुसरा पक्ष भारत राष्ट्र समिती देखील नांदेडमार्गेच महाराष्ट्रात पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. नांदेड जिल्ह्यात दोन सभा घेतल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष केसीआर हे मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर शहरात जाहीर सभा घेत आपला पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करणार आहेत. एमआयएम पक्षाला आलेले यश बघता बीआरएसला देखील अशा प्रकारे यश महाराष्ट्रात मिळेल का? अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.
सभेपूर्वीच अनेकांचा पक्षप्रवेश :24 एप्रिलला केसीआर यांच्या नियोजित सभेपूर्वीच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक मातब्बर नेत्यांनी बीआरएस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यामुळे सभेपूर्वीच हा पक्ष काही प्रमाणात जिल्ह्यात मजबूत झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर सभेमध्ये देखील मोठ्या प्रमाणात नगरसेवक माजी आमदार पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती बीआर एस पक्षाचे खासदार बी.बी. पाटील यांनी दिली.