औरंगाबाद - मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. हा दिवस पाहण्यासाठी काकासाहेब शिंदे जिवंत असायला हवा होता, अशी प्रतिक्रिया काकासाहेबांचे भाऊ अविनाश शिंदे यांनी व्यक्त केली. सरकारने आधीच योग्य पाऊले उचलली असती तर काकासाहेब शिंदेंसारख्या 42 मराठा युवकांचे प्राण गेले नसते, अशी खंत अविनाश यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केली.
मराठा समाजाला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. न्यायालयात मराठा समाजाचे आरक्षण वैध ठरण्यात आले आहे. न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करायला हवे असेही अविनाश शिंदे यावेळी म्हणाले.
काकासाहेब शिंदेचे बंधु अविनाश शिंदेंची प्रतिक्रीया मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात औरंगाबादमध्ये झाली होती. शांततेत सुरू झालेल्या मोर्चाला औरंगाबादमध्येच हिंसक वळण लागल होते. आंदोलन करत असताना आरक्षणाच्या मागणीसाठी कायगाव येथे काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेतली. या घटनेनंतर राज्यात विविध घटनांमध्ये 42 मराठा युवकांनी आरक्षणासाठी आत्महत्या केल्या. न्यायालयात आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत मराठा क्रांती मोर्चाने केले आहे.
बलिदान देणाऱ्या 42 जणांचे स्मरण देखील मराठा बांधवांनी केले. वेळीच सरकारने योग्य भूमिका घेतली असती, तर आज इतक्या जणांनी बलिदान दिले नसते, अशी खंत मराठा बांधवानी औरंगाबादेत व्यक्त केली.