औरंगाबाद - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. मात्र, या वाढललेल्या लॉकडाऊनमुळे सर्वत्र शांतता असताना चोरांनी आता दारू दुकानांना लक्ष करायला सुरुवात केली आहे. औरंगाबादेत गेल्या दहा दिवसात चोरट्यांनी ५ ते ६ दारू दुकान फोडल्याचे प्रकार घडले आहेत. या चोरीत लाखोंची दारू चोरट्यांनी लंपास केल्याचे उघड झाले आहे. तर आज पुन्हा शहरात आणखी एक दारूचे दुकान फोडले आहे.
औरंगाबादमध्ये आणखी एक दारू दुकान फोडले शहरातील बाबा चौकात असलेल्या दारू दुकानाच्या मागची भिंत फोडून चोरट्यांनी दारू चोरी केली. दुकानाच्या व्यवस्थापकाने दुकानाची पाहणी केली असता, ही बाब उघडकीस आली. या प्रकरणी क्रांतिचौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून हजारो रुपयांची दारूची चोरी झाल्याचा अंदाज दुकान मालकाने व्यक्त केला आहे.
दुकानाच्या मागे गोडाऊन आहे, त्या गोदाऊनच्या मागे असलेल्या बंद दुकानातून भिंत तोडून चोरांनी गोडाऊन मध्ये प्रवेश केला. त्यानंतर गोडाऊनची भिंत फोडून दुकानातील दारू चोरून नेली. दुकानातील सीसीटीव्हीत काही हालचाली कैद झाल्या आहेत, त्याआधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
राज्यात कोरोनाच्या अनुषंगाने लॉक डाऊन असल्याने दारूची अवैध विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लॉक डाऊनचा काळ वाढल्याने दारूची तिप्पट भावाने विक्री होत आहे. त्यामुळे चोरांनी आता बंद असलेल्या दारू दुकानांना लक्ष्य केले आहे. वाळूजसह शहरातील पाच ते सहा दुकानांना चोरांनी आत्तापर्यंत लक्ष्य केलं असून लाखोंची दारू या चोरांनी लंपास केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दारूचा काळाबाजार तेजीत असल्याने सील असलेल्या दारू दुकानांना चोरांनी निशाणा केला आहे. आता या चोऱ्या थांबवण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.