औरंगाबाद - कन्नड तालुक्यातील आठेगाव येथील १८ वर्षीय तरुणीचा मृतदेह चापानेर शिवारातील शेतात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तरुणीवर चापानेर शिवारात नेऊन अतिप्रसंग केल्याचा संशय आहे.
हेही वाचा-लंडन ब्रिज हल्ला : हल्लेखोर पोलिसांकडून ठार; चाकू हल्ल्यात दोन नागरिकांचा मृत्यू
शुक्रवारी (काल) रात्री आठ वाजले तरी तरुणी घरी न आल्याने आई-वडिलांनी तिची शोधाशोध केली. मात्र, तरुणी सापडली नाही. याप्रकरणी रविराव रामलाल राव याला संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्याची विचारपूस केली. मात्र, त्याने काही माहिती नसल्याचे सांगितले.
रात्री साडे अकरा वाजता पोलीस निरीक्षक सुनील नेवसे, उपनिरीक्षक बजरंग कुटुंबरे जमादार मनोज घोडके यांनी आठेगाव ते चापानेर परिसर पिंजून काढला. यावेळी चापानेर शिवारात तरुणीचा मृतदेह आढळून आला. रात्रीच तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. संशयित हा गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून चापानेर परिसरात घरातील फरशी बसविण्याचे काम करतो. तरुणीच्या वडिलांशी त्याची ओळख झाली. त्यातून त्याचे घरी येणे जाणे वाढले होते. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.