छत्रपती संभाजीनगरVikasit Bharat Sankalp Yatra :भाजपा पुन्हा एकदा रथ यात्रा काढत आहे. यंदा या रथामध्ये सरकारी योजनांची माहिती नागरिकांना देण्यात येणार आहे. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून एल.ई.डी टिव्ही असलेल्या ट्रक प्रत्येक ग्रामपंचायतीत फिरवण्यात येणार आहे. सलग दोन महिने केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना तळागाळातील नागरिकापर्यंत पोहोचतील, असा विश्वास केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भगवत कराड यांनी आज व्यक्त केला. ते आज छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते.
सर्व विधानसभा मतदार संघात फिरणार रथ :भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित, वंचित लाभार्थींपर्यंत पोहोचावेत, यासाठी केंद्र शासनाच्या वतीनं विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम आखण्यात आली आहे. या यात्रेंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय आवारात डॉ कराड यांच्या हस्ते चित्ररथांना हिरवी झेंडी दाखवून यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यासाठी 7 एलईडी व्हॅन आल्या आहेत. प्रत्येक तालुक्यासाठी एक व्हॅन असून, त्याद्वारे शासकीय योजनांची माहिती जनतेला देणार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, पूर्वी लाभ मिळालेले लाभार्थी यांच्या उपस्थितीत या व्हॅनचं स्वागत केलं जाईल. या माध्यमातून शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती लाभार्थींपर्यंत पोहोचवली जाणार आहे. तसंच नागरिकांना योजनांचा फायदा घ्यायचा असेल, तर त्याबाबत नोंदणी केली जाणार असून योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थींपर्यंत पोहोचवला जाईल. माहितीचा प्रसार, योजनांबद्दल जागरूकता निर्माण करणे, नागरिकांशी संवाद - वैयक्तिक यशकथा, अनुभव कथन, सरकारी योजनांच्या लाभार्थींशी संवाद साधणे असं नियोजन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी दिली.