औरंगाबाद- नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेने पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकार आणि त्यांनी केलेल्या विकासकामांवर विश्वास दाखवला आहे. असाच विश्वास राज्यातील जनता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारवर दाखवेल आणि विधानसभेच्या 220 जागा जिंकून राज्यात पुन्हा युतीचेच सरकार येणार, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला.
220 जागा जिंकून राज्यात पुन्हा युतीचे सरकार येणार; रावसाहेब दानवेंचा दावा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली येत्या 14 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान राज्यात "दिसतोय फरक, शिवशाही परत' हे ब्रीद वाक्य घेऊन यात्रा काढण्यात येणार आहे. या निमित्ताने रावसाहेब दानवे यांनी औरंगाबादेत पत्रकारांशी संवाद साधला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली येत्या 14 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान राज्यात "दिसतोय फरक, शिवशाही परत' हे ब्रीद वाक्य घेऊन यात्रा काढण्यात येणार आहे. या निमित्ताने रावसाहेब दानवे यांनी औरंगाबादेत पत्रकारांशी संवाद साधला. दानवे म्हणाले, मोदींच्या सबका साथ सबका विकासवर शिक्कामोर्तब करत देशातील जनतेने भाजपचे 303 खासदार निवडूण दिले. हीच परिस्थीती येत्या विधानसभेलादेखील असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युती सरकारने राज्यात सर्वांगीण विकास केल्याने यावेळी आम्ही 220 जागा जिंकू आणि राज्यात पुन्हा युतीचेच सरकार आणू, असा विश्वास आम्हाला असल्याचे रावसाहेब दानवे यांनी सांगितले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये अनेकजण प्रवेश करत आहेत, याबद्दल विचारले असता जो येईल त्याला आम्ही भाजपमध्ये घेणार, असे त्यांनी सांगितले. भाजपमधील ज्येष्ठ नेते माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी विधीमंडळाच्या शेवटच्या दिवशी सभागृहात केलेल्या भाषणाचा संदर्भ देत दानवे म्हणाले, एकनाथ खडसे आमचे नेते आहेत, त्यांच्यावर विरोधकांकडून भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला होता. त्यांच्यावरील सगळ्या आरोपांची चौकशी सुरू आहे. त्यांना पक्षात आजही मानाचे स्थान आहे.