औरंगाबाद - कोरोनाची तिसरी लाट येईल का याबाबत सांगण्यासाठी मी उद्धवजी सारखा डॉक्टर किंवा संजय राऊत सारखा कंपाउंडर नाही. कोरोना फक्त उद्धव ठाकरे यांच्याशी बोलतो माझ्याशी नाही, अशी खोचक टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.
लसीकरण बाबत केंद्रांवर टीका तरी महाराष्ट्र अव्वल
लसीकरणाबाबत केंद्र सरकारवर राज्य सरकारकडून सतत टीका करण्यात येते. मात्र, दुसरीकडे सर्वाधिक लसीकरण महाराष्ट्रात झाल्याचे सांगितले जात आहे. याला काय म्हणावे, असा निशाणा चंद्रकांत पाटील यांनी साधला. चंद्रकांत पाटील औरंगाबाद दौऱ्यावर आले असून त्यांनी शहरातील विविध पदाधिकाऱ्यांच्या घरी भेट घेतली. त्यावेळी जगदीश सिद्ध या कार्यकर्त्यांच्या घरी भेट देत असताना नागरिकांशी संवाद साधत त्यांनी सरकारवर टीका केली.