औरंगाबाद - मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. मागील बारा वर्षे वर्चस्व कायम ठेवलेल्या या मतदारसंघात भाजपने आपली ताकद वाढल्याचा दावा केला आहे, तर महाविकास आघाडीत निवडणूक लढल्यास मराठवाड्याची जागा शिवसेनेला सोडण्याची मागणी युवासेनेकडून केली गेली आहे.
राष्ट्रवादीच्या पदवीधर मतदारसंघावर भाजप-शिवसेनेचा दावा मराठवाडा पदवीधर मतदारसंघात मागील बारा वर्षात दोन वेळा झालेल्या निवडणुकीत 2008 च्या निवडणुकीत राज्यातील सर्वच प्रमुख पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते, तर 2014 च्या निवडणुकीत भाजप-सेना युतीत तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत निवडणूक लढले होते. यावेळी भाजप स्वतंत्र लढणार हे जरी पक्के असले तरी महाविकास आघाडीचा काय निर्णय होणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.
मागील बारा वर्षात काम नसल्याचा भाजपचा आरोप -
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात बारा वर्षांपासून राष्ट्रवादीचे वर्चस्व असून सतीश चव्हाण आमदारपदी विराजमान राहिले. या कालावधीत मतदान झाल्यावर उमेदवार मतदारांपर्यंत पोहचला नसल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी केला. पदवीधरचा आमदार हा शिक्षित वर्गातील लोकांचे प्रतिनिधित्व करतो. ज्यामध्ये डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, प्राचार्य, सरकारी कर्मचारी यांचा समावेश आहे. मात्र मागील बारा वर्षांमध्ये या लोकांचे प्रतिनिधित्व कधीही केले नाही, त्यांचे प्रश्न मार्गी लावले नाहीत. कोणतेही आंदोलन केले नाही. त्यामुळे बारा वर्षात आमदार आहेत कुठे असा प्रश्न निर्माण झाल्याने यंदा भाजपला मतदार पसंती देतील असा विश्वास भाजप प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी व्यक्त केला.
2014 पेक्षा 2020 ची भाजपा वेगळी -
2014च्या पदवीधर मतदार निवडणुकीत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच निधन झालं होतं. त्यामुळे थोडा परिणाम झाला होता. मात्र त्या नंतर भाजप दुःख विसरून आणखी मजबूत झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अनेक मोठी मंडळी भाजप सोबत जोडली गेली आहेत. ज्यामध्ये अनेक शिक्षण संस्थाचालकदेखील आहेत. त्यामुळे नक्कीच आम्हाला यश मिळेल असा विश्वास भाजपला आहे.
मराठवाडा पदवीधरची जागा शिवसेनेला सोडण्याची मागणी -
मराठवाड्यात शिवसेनेची ताकद मोठी असल्याने या निवडणुकीत महाविकास आघाडीत शिवसेनेला ही जागा लढावू देण्याची मागणी युवासेनेचे अक्षय खेडकर यांनी केली. मराठवाड्यात शिवसेनेचा जनसंपर्क दांडगा आहे, आमदारांची संख्या जास्त आहे. मागील दोन वर्षांमध्ये ताकद वाढवण्याचे काम शिवसेना आणि युवासेनेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. त्यामुळे शिवसेनेला किंवा युवसेनेला संधी देण्याची मागणी युवासेनेच्या वतीने करण्यात आली आहे.