छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) :लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचे पडसाद आता उमटत आहेत. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)जिल्ह्याची जागा लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची आहे, असा दावा केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केला. ही जागा युतीमध्ये शिवसेनेकडे होती. मात्र 2019 मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यामुळे आता आम्ही ही जागा जिंकू शकतो, म्हणून मी स्वतः देखील इच्छुक आहे, असं ते म्हणाले. राज्यात 45 जागा जिंकण्यासाठी तयारी करत आहोत. देशात 350 जागांचे ध्येय आहे. जिल्ह्यातील ही जागा त्यातीलच एक आहे, अशी माहिती देखील डॉ. कराड यांनी दिलीय.
Maharashtra Politics : मी स्वतः लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक - भागवत कराड - छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघ
लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी आता सुरू झालीय. भाजपा नेते आणि केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनीसुद्धा औरंगाबाद ( छत्रपती संभाजीनगर ) जिल्ह्यातील लोकसभेच्या जागेवर दावा केला आहे. निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
शिवसेनेत दोन गट :जिल्ह्याची लोकसभेची जागा आम्ही अनेकवेळा मागितली आहे. मात्र आमचा मित्रपक्ष या ठिकाणी निवडणूक लढवत होता. परंतु 2019 मध्ये शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे काही मतांनी निवडणूक हरले होते. आता शिवसेनेत दोन गट पडले आहेत. मी स्वतः लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. राष्ट्रीय नेतृत्वाने मिशन 350 लक्ष्य केले आहे. त्यातील एनडीएमध्ये एक जागा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करताना पडणारं 'एक मत' या ठिकाणचं असावं, असं आम्हाला वाटतं. त्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती भाजपा नेते आणि केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली.
निवडणुकीत सर्वाधिक चुरस रंगण्याची शक्यता :औरंगाबाद लोकसभेसाठी इच्छुकांची गर्दी वाढली आहे. एमआयएमकडून इम्तियाज जलील पुन्हा एकदा आव्हान देण्यास सज्ज झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे इच्छुक आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार इच्छुक आहेत. काँग्रेसकडून पुन्हा एकदा सुभाष झांबड, कल्याण काळे इच्छुक आहेत, तर भाजपाकडून सर्वाधिक इच्छुकांची गर्दी आहे. त्यात अतुल सावे, संजय केनेकर, विजया रहाटकर, प्रशांत बंब, डॉ. भागवत कराड इच्छुक आहेत. नव्याने दाखल झालेल्या बीआरएस पक्षातून माजी आमदार हर्षवर्धन जाधव, कादिर मौलाना तर वंचित बहुजन आघाडीही सक्षम उमेदवारांना मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. त्यामुळे औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चुरस रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हेही वाचा :
- Maharashtra Politics: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची तयारी सुरू; महायुतीसह महाविकास आघाडीने बोलावली आज बैठक
- Maharashtra Politics: लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून शिंदे गटाचे वाढले टेन्शनच; भाजप - शिंदे गट युतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता
- Congress Meetings : लोकसभा पूर्वतयारीसाठी काँग्रेसच्या बैठका; पवार-अदानी भेटीवरून नानांचा राष्ट्रवादीला चिमटा