औरंगाबाद -शेतकऱ्याच्या मुलांना आदित्य ठाकरे प्रमाणे समजावे आणि शेतकऱ्यांना कुटुंबातील घटक समजावे तरच मुख्यमंत्री शेतकऱ्यांना मदत करू शकतील, असा टोला माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचा पाहणी दौरा केला. यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले, मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीच्या फटक्याने शेतकऱ्यांच्या हाताशी आलेली पिके ही आता पूर्णपणे उध्वस्त झालेली आहेत. त्यामुळे त्यांना तातडीने मदत करावी. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याआधी दिलेला शब्द पूर्ण करत बागाईत शेतकऱ्यांना 50 हजार तर कोरडवाहू शेतकऱ्यांना 25 हजार हेक्टरी मदत करावी, अशी मागणीही बोंडे यांनी यावेळी केली.