छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):एकेकाळी राज्यात प्रसिद्ध असलेले संत ज्ञानेश्वर उद्यान काही वर्षांपासून बंद आहे. उद्यानाची दुरुस्ती झाली नसल्याने सर्वसामान्यांसाठी ते बंद ठेवण्यात आले होते; मात्र आता हे उद्यान पुन्हा नव्याने सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून उद्यानाच्या विकासकामांचा भूमिपूजन सोहळा शुक्रवारी पैठण येथे घेण्यात आला; मात्र कार्यक्रमाला उशीर झाला. कार्यक्रमाच्या ठिकाणी उभारलेला मंडप छोटा आणि खुर्च्या कमी असल्याने पालकमंत्री भुमरे हे चांगलेच संतप्त झाले. व्यासपीठावरूनच त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावले. त्यानंतर तातडीने खुर्च्या बोलवण्यात आल्या. दरम्यान भुमरे यांनी रागातच स्वागत स्वीकारले. त्यांच्या चेहऱ्यावरचा राग सर्वांना दिसून येत होता. रागामुळे भुमरे यांची चिडचिड होत होती. चिडचिडीत त्यांनी स्वागताची शालही खाली टाकून दिली.
उष्माघातामुळे दुपारचे कार्यक्रम नकोच:खारघर येथे तळपत्या उन्हात झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमात लाखोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दर्शविली होती; मात्र नियोजनाअभावी 16 भाविक उष्माघाताचे बळी ठरले. त्यामुळे कार्यक्रमाला गालबोट लागले होते. या घटनेनंतर राज्य सरकारने उन्हात कार्यक्रम घेऊ नका, अशा सूचना दिल्या होत्या. दुपारी 12 ते 5 या काळात कोणतेही जाहीर कार्यक्रम घेऊ नये, असे निर्देश सरकारतर्फे देण्यात आल्यानंतरही राज्यातील मंत्री ऐन उन्हात कार्यक्रम घेण्याचा धडाका लावला आहे.