छत्रपती संभाजीनगर :शंभरहून अधिक पदके भार्गवी कराडने पटकावत आजपर्यंत आपली चमकादार कामगिरी केली आहे. मात्र सुविधा मिळाल्यास आणखीन चांगली कामगिरी करता येईल असे मत भार्गवी कराडने व्यक्त केले. भार्गवी कराड रोलर स्केटिंग या प्रकारात देशपातळीवर आपले नाव कमावले आहे. अतिशय नियंत्रण ठेवून खेळला जाणारा हा खेळ प्रकार मानला जातो. अवघ्या 14 वर्षाच्या मुलीने आतापर्यंत बारा गोल्ड, तीन सिल्वर आणि दोन ब्रांझ पदकांची कमाई केली आहे. यात राष्ट्रीय पातळीवर एक ब्रांझ बदकाचा समावेश आहे.
रोलर स्केटिंग प्रकारात केली उत्तम कामगिरी : शंभरहून अधिक पदक तिने आजपर्यंत कमाविले आहेत. त्यासाठी खेळासोबतच अभ्यासाची उत्तम सांगड घालत तिने ही कामगिरी केली आहे. शहरात सराव करण्यासाठी ट्रॅक नसल्याने पहाटे उठून रस्त्यावर तर शनिवार - रविवारी सुट्टीच्या दिवशी पुण्याला जाऊन सराव करते. मात्र अडचणींवर मात करून ती आपल्या खेळात पुढे जात आहे.
असा आहे भार्गवीचा दिनक्रम : भार्गवी कराड रोलर स्केटिंग प्रकारात आपली कामगिरी दिवसेंदिवस सुधारत आहे. यासाठी कठोर परिश्रम ती घेते. सकाळी चार वाजता उठून ती मोकळ्या रस्त्यावर जाऊन सराव करते. त्यानंतर नाष्टा करून ती शाळेत जाते. दुपारी आल्यावर थोडा अभ्यास आणि थोडा वेळ आराम करून सायंकाळी आईसोबत पुन्हा एकदा चिकलठाणा परिसरात, तर कधी सावंगी परिसरात ती सरावाला जाते. मात्र सराव ट्रॅक नसल्याने हा सराव तिला रस्त्यावरच करावा लागतो. त्यानंतर रात्री आल्यावर जेवण करणे आणि झोपणे असा दिनक्रम नित्याचा झाला आहे. आपल्या आवडत्या खेळात स्वतःला झोकून देऊन ती, कसून सराव करत आहे. त्यामुळेच एवढ्या कमी वयात तिने देश पातळीवर आपले नाव कमाविले आहे.