गंगापूर(औरंगाबाद)-गंगापूर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णाला जिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी खासगी वाहनाचा वापर करावा लागल्याचा प्रकार समोर आला. या रुग्णाला आरोग्य विभागाची 108या क्रमांकावरून सेवा देणारी रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने रुग्णांच्या नातेवाईंकांना स्वखर्चाने खासगी वाहनाचा पर्याय स्वीकारावा लागला आहे. विशेष म्हणजे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयास भेट देण्याच्या 10 मिनिटे आधीच हा प्रकार घडला. त्यावेळी रुग्णांच्या नातेवाईंकांनी थेट आरोग्यमंत्र्यांचे या घटनेकडे लक्ष वेधले. त्यावेळी टोपे यांनी आरोग्य अधिकाऱ्यांची कान उघडणी केली.
सरकारी रुग्णवाहिका उभीच, रुग्ण खासगी वाहनाने जिल्हा रुग्णालयात; आरोग्य मंत्र्यांकडून कान उघडणी
उपजिल्हा रुग्णालयात एका महिला रुग्णाला नेण्यासाठी 108 रुग्णवाहिका मिळाली नसल्याने खासगी गाडीने जिल्हा रुग्णालयात नेण्याची वेळ आल्याचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयास भेट देण्याच्या 10 मिनिटे आधीच हा प्रकार घडला. त्यावेळी रुग्णांच्या नातेवाईंकांनी थेट आरोग्यमंत्र्यांचे या घटनेकडे लक्ष वेधले.
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे शनिवारी औरंगाबाद जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांनी गंगापूर तालुक्यातील झोडेगाव येथे शनिवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान शिवना नदीच्या महापुराने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी गंगापूर उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. तत्पूर्वी उपजिल्हा रुग्णालयात एका महिला रुग्णाला नेण्यासाठी 108 रुग्णवाहिका मिळाली नसल्याने खासगी गाडीने जिल्हा रुग्णालयात नेण्याची वेळ आल्याचा प्रकार घडला होता. या घटनेमुळे नातेवाईंकांकडून रुग्णालय प्रशासनावर रोष व्यक्त केला जात असतानाच आरोग्यमंत्री तिथे पोहोचले. त्यानंतर टोपे यांनी हा प्रकार जाणून घेतला.
चालक नसल्याने तीन महिन्यापासून नवीन रुग्णवाहिका उभीच-
टोपे यांनी माहिती घेतली असता असे निदर्शनास आले की, गंगापूर उपजिल्हा रुग्णालयास नवीन रुग्णवाहिका मिळाली असुन गेल्या तीन महिन्यांपासून रुग्णवाहिका चालक नसल्यामुळे उभीच आहे. सामान्य नागरिकांना रुग्णवाहिका मिळत नसल्याने पर्यायाने खासगी वाहनमालकांना जास्तीचे पैसे देऊन रुग्णांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. मात्र केवळ चालक नसल्याने रुग्णांना आर्थिक फटका बसत असल्याचे लक्षात येताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तत्काळ रुग्णवाहिकेवर चालकाची नियुक्ती करण्याच्या सूचना वैद्यकीय अधीक्षक डॉ.रमेश पवार यांना दिल्या.