औरंगाबाद - कोरोनामुळे ऑनलाईन परीक्षा देणाऱ्या बीकॉम पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना एका विषयात चक्क शून्य गुण देण्यात आले आहेत. याबाबत तक्रार केल्यावर नवी गुणपत्रिका देण्यात आली. त्यात विद्यार्थी पासही झाले. मात्र, दोन दिवसांनी पुन्हा जुनीच गुणपत्रिका देऊन आता यात बदल होणार नाही, असं उत्तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने दिल्याने विद्यार्थी निराश झाले आहेत.
एक हजारहून अधिक विद्यार्थ्यांना शून्य गुण
कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यात परीक्षा देखील लांबल्या. उशिरा का होईना विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या पदवी परीक्षा घेतल्या. मात्र, बीकॉम अभ्यासक्रमातील पहिल्या वर्षात शिकणाऱ्या जवळपास एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना एकाच विषयात नापास करण्यात आलं. या सर्व विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर विषयात चक्क शून्य गुण देण्यात आले. याबाबत विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान पाहता पुन्हा तपासणी करण्यास विद्यापीठ तयार नसल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं.
तीन वेळा काढली गुणपत्रिका
जून महिन्यात बीकॉम पहिल्या वर्षाचा निकाल लावण्यात आला. हा निकाल लागल्यावर विद्यार्थ्यांना धक्का बसला. कारण, बहुतांश विद्यार्थ्यांना COMPUTER APPLICATION IN BUSINESS या विषयात शून्य गुण देण्यात आले. याबाबत विद्यार्थ्यांनी विद्यापीठात तक्रार केली. दोन दिवसामध्ये नवे गुण जाहीर करत विद्यापीठाने नव्याने गुणपत्रिका दिली. मात्र पुढील दोन दिवसांनी पुन्हा नवी गुणपत्रिका देण्यात आली. ज्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना पुन्हा त्याच विषयात शून्य गुण देण्यात आले. एका आठवड्यात तीन गुणपत्रिका मिळाल्या, तरी त्यातला तांत्रिक घोळ कायम आहे.