कन्नड - बारामती अॅग्रो युनिट 2 कन्नड च्या आठव्या गळीत हंगामाचा शुभारंभ उपाध्यक्ष सुभाष आबा गुळवे यांच्या हस्ते करण्यात आला. सोबतच बारामती अॅग्रो युनिट 2 तर्फे ऊसतोड कामगार, कारखाना कर्मचारी यांच्यासाठी कारखाना परिसरात कोविड-19 च्या उपचारासाठी तसेच, इतर आजारासाठी 100 खाटांचे कोविड सेंटर अत्याधुनिक सुविधांसह सुरू करण्यात आले. त्याचे उदघाटन कन्नड तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बारामती अॅग्रो एक व दोनचे व्यवस्थापक संजय सस्ते, मिलिंद देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदर कोविड सेंटर बारामती अॅग्रोचे अध्यक्ष आमदार राजेंद्र पवार व मुख्य अधिकारी आणि आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून सुरू करत असल्याची माहिती गुळवे यांनी दिली. दरम्यान, मंगळवारी सकाळी उसाची मोळी टाकून गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.
हेही वाचा -पूजा, उत्सवांसाठी मध्य रेल्वे चालवणार 48 विशेष ट्रेन
कन्नड तालुक्यासह भडगाव, चाळीसगाव, फुलंब्री आदी परिसातील 42 हजार एकर उसाची नोंद झालेली असून यावर्षी 9 लाख टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 15 एप्रिल पर्यंत हे उद्दिष्ट साध्य करणार असल्याचे उपाध्यक्ष गुळवे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
तसेच, पुढील वर्षासाठी उसाचे क्षेत्र तालुक्यात वाढविण्यासाठी बारामती अॅग्रो उसाचे बेणे शेतकऱ्यांना उधारीवर देणार आहे. नोव्हेंबर पासून शेतकऱ्यांना बांधावर जाऊन अत्याधुनिक पद्धतीने उसाच्या लागवडीबाबद मार्गदर्शन करणार आहे. शेतकऱ्यांसाठी 10001, 86032 या जातीच्या उसाची रोपे कारखान्याच्या रोपवाटिकेत तयार करण्यात आली असून ती लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रति रोप केवळ 2 रुपये दराने उपलब्ध करून देणार आहे.
यावर्षी अतिवृष्टीमुळे ऊस पीक वगळता इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरीवर्ग चिंतातूर झाला आहे. मात्र, ऊस पिकावर अतिवृष्टीचा फारसा परिणाम होत नसल्याने इतर पीक उत्पादक शेतकरी आता ऊस उत्पादनाकडे वळेल व उसाचे क्षेत्र नक्कीच वाढेल असा विश्वासही गुळवे यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखविला.
हेही वाचा -'आपत्तीग्रस्तांना मोफत शिधावाटप करणार'