औरंगाबाद- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व बाजार पेठ बंद करण्याचा शासनाकडून निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, नागरिकांना आर्थिक गैरसोय होऊ नये यासाठी बँकेचे व्यवहार सुरू ठेवण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. त्यामुळे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बँकांनीदेखील ग्राहकांपासून ३ फूट अंतर ठेवण्यासाठी नवी शक्कल लढवली आहे. मेन काउंटरपासून ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी चक्क खुर्च्यांना दोरी बांधून अंतर ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
शहरातील सारस्वत बँकेत प्रवेश करत असताना सुरक्षारक्षक सॅनिटायझर लावून हात स्वछ करूनच प्रवेश देत आहेत. बँकेत गेल्यावर बँक कर्मचारी आणि ग्राहक यांच्यात योग्य अंतर असावे यासाठी काउंटर जवळ खुर्च्यांना दोरी बांधून ३ फुटाचे अंतर निश्चित करून दिले आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी बँकेतील कर्मचारी आणि रोखीचे व्यवहार पाहणारे कर्मचारी तोंडाला मास्क आणि हातात हातमोजे घालून रोख रक्कम हाताळताना दिसून येत आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या भीतीने बँकांमधील ग्राहकांची गर्दी जवळपास ८० टक्क्यांनी घटल्याचेदेखील समोर आले आहे.