औरंगाबाद -कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना नागरिकांमध्ये लसीकरण संदर्भात समज-गैरसमज आहेत हेच समज गैरसमज दूर करण्यासाठी सेवांकुर च्या माध्यमातून भावी डॉक्टर शहरातील नगर आणि गावातील गल्ला पिंजून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम करत आहेत.
राज्यामध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. वाढती रुग्ण संख्या प्रशासनासह नागरिकांमध्ये चिंतेची बाब ठरत आहे. कोरोाना रुग्णांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनातर्फे विविध पातळीवर उपाययोजना राबविल्या जात आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. यासाठी प्रशासन लसीकरण युद्धपातळीवर राबवत आहेत. मात्र असे असले तरी नागरिकांमध्ये लसीकरण संदर्भात समज-गैरसमज आज देखील बघायला मिळत आहेत. नागरिकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी हे विद्यार्थी आता प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक गावांमध्ये जात आहेत.
एक लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले विद्यार्थी -
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व जनकल्याण तसेच डॉ. हेडगेवार रुग्णालय व सेवांकुर संस्थेतर्फे गेल्या 25 दिवसांपासून औरंगाबाद शहरामध्ये लसीकरण संदर्भात जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये आतापर्यंत 75 विद्यार्थी निस्वार्थीपणे आपले कर्तव्य बजावत असून हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेणारे आहेत. महाराष्ट्रातील विविध कॉलेजमधील हे विद्यार्थी असून शहरात जिल्ह्यात ग्रामीण भागात जाऊन लसीकरणाची जनजागृती करत आहेत. सेवांकुर संस्थेने दिलेल्या माहितीवरून आतापर्यंत एक लाख नागरिकांपर्यंत ही टिम पोहोचली आहे. यामुळे या नागरिकांमध्ये लसीकरण या संदर्भात जनजागृती करण्यात आली आहे.