औरंगाबाद- शहरात लावण्यात आलेल्या नऊ दिवसांच्या लॉकडाऊननंतर रविवार पासून उद्योग पुन्हा सुरू होणार आहेत. उद्योग पुन्हा सुरू करताना उद्योजकांनी विशेष काळजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार उद्योगांमध्ये काम करणाऱ्या सर्वच कामगारांची अँटीजन तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती उद्योजक राम भोगले यांनी दिली.
रविवार पासून तातडीच्या पद्धतीने तपासणी करण्यात येणार असून या तपासणीसाठी लागणार खर्च उद्योजक, महानगर पालिका आणि जिल्हापरिषद मिळून करणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात उद्योजक आणि जिल्हाधिकारी यांची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या तपासणीमुळे उद्योग क्षेत्रात कोरोना पसरण्याच्या चर्चा थांबण्यास मदत होईल आणि तपासणी करण्याबाबत भीती निघून जाईल, असा विश्वास राम भोगले यांनी व्यक्त केला.
लॉकडाऊन १ नंतर औरंगाबाद जिल्ह्यातील जवळपास सर्वच उद्योग सुरू करण्यात आले. मात्र, त्याच बरोबर बजाज सारख्या मोठ्या उद्योग समूहांमध्ये कोरोनाचे शिरकाव केल्याचे पाहायला मिळाले. पाहता-पाहता या उद्योगनगरामध्ये कोरोनाबधितांची संख्या वाढल्याचे पाहायला मिळाले. ही संख्या नियंत्रित आणण्यासाठी जनता कर्फ्युमध्ये उद्योजकांनी सहभाग घेत आपले उद्योग बंद ठेवले. कोट्यवधींचे नुकसान यामध्ये झाले. त्यामुळे यापुढे उद्योग बंद करण्याची वेळ येऊ नये, यासाठी कर्फ्यू संपल्यावर कायम स्वरूपी उपाय योजना करण्याबाबत एक नियमावली तयार करण्यात आली असल्याची माहिती उद्योजक राम भोगले यांनी दिली.
औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या सर्व कामगारांची होणार अँटीजन टेस्ट
उद्योग पुन्हा सुरू करताना उद्योजकांनी विशेष काळजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार उद्योगांमध्ये काम करणाऱ्या सर्वच कामगारांची अँटीजन तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती उद्योजक राम भोगले यांनी दिली.
ज्यामध्ये कामगारांच्या तापसणीकरण्याबाबत योग्य सूचना देण्यात आल्या असून सध्या शहरात रॅपिड टेस्ट सुरू आहेत. त्यामुळे जिल्हापरिषद आणि मनपा यांच्या माध्यमातून रॅपिड टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच नियोजन दोन दिवसांमध्ये केलं जाईल, याचा खर्च मनपा, जिल्हा परिषद आणि उद्योग संघटना करणार आहेत. यामध्ये लक्षण नसलेल्या लोकांचे निदान होईल. त्यामुळे अनेकांची शंका निघून जाईल, उद्योगांमध्ये काम करणाऱ्या लोकांची तपासणी झाल्याने योग्य माहिती जमा होईल आणि लोकांच्या मनातील भीती निघून जाईल. उद्योग सुरू झाल्यावर पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त कामगार काम करत नाहीत. सर्व उद्योजकांना या तपासणीत सहभागी व्हावे लागेल. त्या माध्यमातून दोन ते अडीच लाख तपासण्या केल्या जातील. ज्यामुळे कोरोनाचा शिरकाव थांबवण्यात मदत होईल, असा विश्वास उद्योजक राम भोगले यांनी व्यक्त केला.