औरंगाबाद- राज्यात कोरोनाचा विळखा वाढत आहे. त्याचप्रमाणे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण परसले आहे. मात्र, कोरोना म्हणजे मृत्यू असे काही नाही. कोरोनाची लागन झालेले अनेक संक्रमित ठणठणीत बरे झाले आहेत. औरंगाबाद मधील कोरोना संक्रमित महिलेने देखील कोरोनावर मात केली आहे. त्या महिला प्राध्यापिकेचा अहवाल आज निगेटिव्ह आला आहे.
हेही वाचा-इटलीत अडकलेल्या भारतीयांची दुसरी बॅच आज 'एअरलिफ्ट'
रशियाहून परत येत असताना खूप जास्त काळजी घेतली. प्रत्येक ठिकाणी सॅनिटायझरचा वापर केला. कोणाच्या जास्त संपर्कात येणार नाही याची काळजी घेतली. त्यामुळे मला कोरोना होईल असे कधीही वाटले नाही. मात्र, 7 मार्च पासून ताप आलानंतर खोकला वाढला. त्यानंतर तपासणीत आजार झाल्याचे लक्षात आल्याने धक्काच बसला. रुग्णालयात उपचार घेताना आपल्या कुटुंबीयांना देखील भेटता आले नाही, असे त्या महिलेने सांगितले.
मला वाटले नव्हते मी कोरोना पॉझिटिव्ह असेल. तसे काही लक्षण नव्हते. रशियात फिरताना सर्व ठिकाणी काळजी घेतली होती. आल्यानंतर नियमित पणे महाविद्यालय कामावर रुजू झाले. विद्यार्थ्यांच्या तोंडी परीक्षा घेतल्या. 7 मार्च पासून ताप आल्यानंतर खोकला वाढला. मी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. त्यानंतर माझे स्वाईन फ्लू व कोरोनासाठी लाळेचे नमुने घेतले. माझा अहवाल निगेटिव्ह येईल, असा विश्वास होता. स्वाईन फ्लूचा अहवाल अपेक्षेप्रमाणे निगेटिव्ह आला. मात्र, कोरोनाचा अहवाल पाॅझिटिव्ह आला.
अहवाल पाॅझिटिव्ह आल्यामुळे माझ्यापासून कोणी संक्रमित झाले नाही ना, असे मनात येऊ लागले. माझ्याजवळ मोबाईल होता. त्यामध्ये मेसेज करून अनेकांनी माझ्याबद्दल विचारणा केली. मात्र, रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टरांनी योग्य काळजी घेतल्याने मला दिलासा मिळत होता. उपचार घेताना रोज आपल्यामुळे कोणी आजारी तर पडले नसेल ना, इतकीच भीती वाटत होती. मात्र, सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने आता बरे वाटत असल्याचे पीडित महिलेने सांगितले.