औरंगाबाद - औरंगाबाद जिल्हा परिषदेत सेनेला बंडखोरांनी दणका दिला. शिवसेना बंडखोर, सत्तार समर्थक आणि भाजपच्या मतांवर भाजपचे गायकवाड उपाध्यक्ष झाले. तर, महाविकास आघाडीचा पराभव थोडक्यात टळला. औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या मिनाताई शेळके यांची तर उपाध्यक्षपदी भाजपच्या लहानू गायकवाड यांची निवड करण्यात आली. शिवसेना बंडखोरांमुळे शिवसेनेला सत्तेत पद मिळवता आले नाही. गद्दारी करणाऱ्यांवर आम्ही कारवाई करू, असा इशारा जिल्हाध्यक्ष आमदार आंबदास दानवे यांनी दिला आहे. तर, ग्रामीण भागात राहिलेले प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन यावेळी नवनिर्वाचित अध्यक्षांनी दिले.
औरंगाबाद जिल्हापरिषद अध्यक्ष पदावरून गेल्या २ दिवसांपासून मोठा गदारोळ झालेला पाहायला मिळाला. शुक्रवारी अध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या दोन्ही उमेदवारांना समसमान मत मिळाल्याने गोंधळ झाला. त्यामुळे, निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला होता. शनिवारी निवडणूक प्रक्रिया पार पाडत असताना पुन्हा महाविकास आघाडीच्या मिनाताई शेळके आणि शिवसेना बंडखोर देवयानी डोणगावकर यांना समसमान म्हणजे ३०-३० मते मिळाली. त्यामुळे चिठ्ठी काढून निर्णय घेण्यात आला. ज्यामध्ये मिनाताई शेळके यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला. तर, उपाध्यक्ष पदावर भाजपच्या लहानू गायकवाड यांना सहज विजय मिळाला.
गायकवाड यांनी ३२ विरोधात २८ मते मिळवत विजय मिळवला. शिवसेना बंडखोर देवयानी डोणगावकर यांच्यासह सत्तार समर्थक काँग्रेसच्या ६ सदस्यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात मतदान केल्याने शिवसेनेला चांगलाच फटका बसला. त्यामुळे शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या जिल्हा परिषदेत शिवसेनेला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाला मुकाव लागले. अब्दुल सत्तार यांची नाराजी दूर करून जिल्हा परिषदेत मत पारड्यात पाडून घेण्यासाठी अर्जुन खोतकर यांनी केलेले प्रयत्न अपयशी झाल्याचे पाहायला मिळाले.