औरंगाबाद- राज्यातील विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी सुरू केलेला बंद स्थगित करण्यात आला. सरकारच्या आश्वासनानंतर 19 ऑक्टोबरपर्यंत हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. कैलास पाथ्रीकर यांनी दिली.
औरंगाबाद विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे आंदोलन 19 ऑक्टोबरपर्यंत स्थगित गेल्या काही दिवसांपासून सातवा वेतन आयोग लागू करावा, या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी राज्य विद्यापीठ कर्मचारी संघटनेच्या वतीने 'लेखणी बंद' आंदोलन करण्यात आले होते. सरकार निर्णय घेत नसल्याने 1 ऑक्टोबरपासून विद्यापीठ बंदची हाक कर्मचारी संघटनेने दिली होती. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या आश्वासनामुळे आंदोलन तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय संघटनेने घेतला.
हेही वाचा -कोरोनाबाधितांना अतिरिक्त बिल आकारणाऱ्या 14 खासगी रुग्णालयांना औरंगाबादमध्ये नोटीस
विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. गुरुवारी दुपारी सरकारसोबत पुन्हा एकदा बैठक घेण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऑनलाईन पद्धतीने बैठक घेतली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना कोरोना झाला असताना त्यांनी ऑनलाईन पद्धतीने बैठकीत सहभाग घेतला. या बैठकीत पुढील पंधरा दिवसांमध्ये सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत योग्य तो निर्णय घेऊ असे आश्वासन देण्यात आले.
त्यानुसार 16 ऑक्टोबरपर्यंत सरकारला निर्णय घेण्याचा अवधी संघटनेच्या वतीने देण्यात आला. या आधी सरकारने आश्वासन देऊन मागण्या मान्य केल्या नाहीत. त्यामुळे आंदोलन मागे न घेता स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार 16 ऑक्टोबरपर्यंत हे आंदोलन स्थगित करण्यात आले असून सरकारने योग्य निर्णय न घेतल्यास 19 ऑक्टोबरपासून पुन्हा आंदोलनाला सुरुवात करण्यात येईल, असा इशारा राज्य विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष आणि माहिती समितीचे राज्य समन्वयक डॉ. कैलास पाथ्रीकर यांनी दिला.
हेही वाचा -कोरोनामुळे शाळा बंद; शिक्षकांवर आली केळी चिप्स विकण्याची वेळ